लोकमत न्यूज नेटवर्क
निमोणे : शिंदोडी (ता. शिरूर) परिसरातील घोडनदी पात्रात शिरूर पोलीस व महसूल विभाग यांनी धडक कारवाई करत अवैध वाळूउपसा आणि वाहतूक करणाऱ्या बोटी नष्ट केल्या. यात वाळूतस्करांची सुमारे एक कोटी दहा लाख रुपये किमतीचे साहित्य नष्ट करण्यात आले. शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांच्या धडक कारवाईने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
शिंदोडी (ता. शिरूर) परिसरातील घोडनदी पात्रात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध वाळूउपसा व वाहतूक चालू होती. शिरूर हद्दीतून वाळूचे बेकायदा उत्खनन करून श्रीगोंदा (जि. अहमदनगर) हद्दीत चोरून नेण्याचा प्रकार चालू होता. यासंदर्भात शिरूर पोलीस ठाण्याला माहिती मिळाली. त्यांनी रात्र गस्तीद्वारे याची खात्री केली. ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, बारामती अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते व दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली करून कारवाईचे नियोजन केले. शिरूरचे तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाचे संयुक्त पथक कारवाईसाठी तयार करण्यात आले. या कारवाई संदर्भात गुप्तता पाळण्यात आली. शुक्रवारी (दि.३) ६ वाजता तहसिलदार एल. डी. शेख व शिरूरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या पथकाने त्या वाळूउपसा होत असलेल्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी अवैध वाळू उत्खनन चालू असल्याचे आढळले. पोलीस व महसूल पथकाची चाहुल लागताच वाळू तस्कर शिरूर हद्दीतून बेलवंडी (ता. श्रीगोंदा) हद्दीत पळून जाऊ लागले. तेव्हा या पथकाने बेलवंडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून त्यांचेकडील पोलीस पथक त्या बाजुने मागवून घेतले. तस्करांना दोन्ही बाजुने घेरून स्पीड बोटीद्वारे पाठलाग केला. यावेळी तस्कर बोटी सोडून फरार झाले. पोलिसांच्या पथकाला या ठिकाणी पाच हायड्रोलिक व पाच वाळू वाहून नेणाऱ्या पाच अशा दहा बोटी मिळून आल्या. त्या नदीकिनारी नष्ट करण्यास आल्या. यात वाळूतस्करांचे सुमारे एक कोटी दहा लाख रुपयांचे नुकसान झाले.
यासंदर्भात कामगार तलाठी विजय बेंडभर यांनी शिरूर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फोटो : शिंदोडी (ता. शिरूर) येथे अवैध वाळूउपशावर छापा टाकताना शिरूरच्या तहसीलदार एल. डी. शेख, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत व पथक.