लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नात्यातील अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्याशी लग्न करून बलात्कार केल्याप्रकरणी एकाला सात वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. तर मुलीला पळवून नेल्याप्रकरणी दोघांना तीन वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी दोन हजार रुपये रुपये दंडाची शिक्षा झाली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी हा निकाल दिला.
संजय लिंबाजी महानवर (वय ३०) याला बलात्कार प्रकरणी तर मंगेश गजानन महानवर (वय २६), धनाजी महादेव महानवर (वय ३०, रा. बारामती) यांनी मुलीला पळवून नेल्याप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. १७ वर्षीय पीडित मुलीच्या आईने जेजुरी पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली होती. जून २०११ मध्ये हा प्रकार घडला. खटल्याचे कामकाज सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी पाहिले. त्यांनी 10 साक्षीदार तपासले. त्यात पीडितेची साक्ष आणि वैद्यकीय पुरावे महत्त्वाचे ठरले.
संजय आणि संबंधित मुलगी यांची ओळख त्यांच्या नात्यातील एका लग्नात झाली होती. आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखविले. मात्र त्याचे लग्न झालेले असल्यामुळे घरचे लोक विरोध करतील असे सांगून नंतर त्याने लग्नाला नकार दिला होता. त्यानंतर संजय मुलीला घेऊन पळून गेला. मंगेश आणि धनाजी हे दोघेही त्यावेळी त्याच्याबरोबर होते. ते तिला घेऊन अलिबागला त्यांच्या एका मित्राच्या घरी गेले. संजयने तिथे तिच्याबरोबर लग्न केले. त्यांचे लग्न झाल्यानंतर मंगेश आणि धनाजी हे तेथून निघून गेले होते. ज्या मित्राच्या घरी लग्न झाले तेथे मंगेशने मुलीवर बलात्कार केला, असे फिर्यादीत नमूद आहे.