पुणे : ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र अण्णाजी उर्फ रामभाऊ जोशी (१०१) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन कन्या, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
जोशी हे मूळचे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील चिंचणी या गावचे. त्यांनी १९५०मध्ये पत्रकारितेत प्रवेश केला. पुणे येथे सायं दैनिक ‘लोकराज्य’, दै. संध्या, दैनिक केसरीत उपसंपादक, प्रमुख वार्ताहर, सहसंपादक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष, महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे चार वर्षे अध्यक्ष, इंडियन फेडरेशन ऑफ जर्नालिस्ट संघटनेच्या कौन्सिलचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले. यशवंतराव- इतिहासाचे एक पान, वेणुताई चव्हाण यांच्या जीवनावरील ‘ही ज्योत अनंताची’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.