पुणे : केंद्र सरकारच्या अधिकृत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) ‘इंडियन पॅनोरमा’ या विभागात वैभव खिस्ती व सुहृद गोडबोले दिग्दर्शित ‘जून’, शशांक उडपूरकर दिग्दर्शित ‘प्रवास’ आणि मंगेश जोशी दिग्दर्शित ‘कारखानीसाची वाडी’ या तीन मराठी चित्रपटांची निवड झाली आहे.
इंडियन पॅनोरमाच्या ‘नॉन फिचर फिल्म’ विभागात राज प्रीतम मोरे दिग्दर्शित ‘खिसा’, हिमांशू सिंग दिग्दर्शित ‘पांढरा चिवडा’ आणि ओंकार दिवाडकर दिग्दर्शित ‘स्टिल अलाइव्ह’ या लघुपटांची निवड झाली आहे. केंद्र सरकारतर्फे आयोजित केला जाणारा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर २०२० या कालावधीत पार न पडल्याने १६ ते २४ जानेवारी २०२१ या दरम्यान होणार आहे. ५१ वा इफ्फी हायब्रीड म्हणजे प्रत्यक्ष आणि ऑनलाइन अशा दोन पद्धतींनी होणार आहे. तीन वर्षांत अनुक्रमे नऊ, दोन आणि गेल्या वर्षी पाच मराठी चित्रपट निवडण्यात आले होते. ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात मराठी चित्रपटांचे प्रमाण कमी होत असून, मल्याळम्, बंगाली या भाषांतील चित्रपटांचा वरचष्मा यंदाही कायम आहे.
---------------