येरवडा - "ते" त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त स्वतःच्या जुन्या शाळेत आले होते. मात्र एकंदरीतच शाळेची अवस्था बघून त्यांना अत्यंत वाईट वाटले. महापालिकेच्या शिक्षण प्रमुखांसह संबंधित विभागांच्या जबाबदार अधिकाऱ्यांना त्यांनी फोन करून शाळेच्या दुरवस्थेबाबत उपाययोजना करण्याची सूचना केली. ज्या शाळेने हजारो विद्यार्थी घडवले, त्यात शाळेची आज झालेली दुरावस्था बघून शाळेचे माजी विद्यार्थी असणारे सध्याचे जिल्हा न्यायाधीश यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. तात्काळ अधिकारी शाळेत हजर झाले, सगळी कामे मार्गी लावण्याचे त्यांनी कबूल केले. मात्र प्रत्यक्षात खरंच या समस्या सुटणार का? असा सवाल निर्माण झाला आहे.
येरवड्यातील पुणे महापालिकेची शहरासह जिल्ह्यातील सर्वात मोठी शाळा म्हणून ओळख असणारी शाळा नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय. सर्वाधिक विद्यार्थी संख्या असणारी शाळा म्हणून या शाळेचा लौकिक, याच शाळेत हजारो विद्यार्थी घडले. नगरसेवक, महापौर, उपमहापौर, आमदार यांच्यासोबतच उद्योजक, प्रशासकीय मोठे अधिकारी आणि महत्वाचे म्हणजे सुजाण नागरिक देखील इथेच घडले. पण मागील काही वर्षापासून शाळेची मोठ्याप्रमाणावर दुरावस्था झाली आहे. सुरक्षेसह स्वच्छता, कमी होणारी पटसंख्या यासह अनेक समस्यांनी शाळा प्रशासन ग्रासलेले आहे.
कोट्यावधी रुपये निधी अनावश्यक कामांसाठी खर्च करणाऱ्या लोकप्रतिनिधींना या शाळेची सुरक्षा किंवा आवश्यक उपाययोजना महत्त्वाच्या वाटत नाहीत. अनेकदा अर्ज विनंत्या करून देखील त्याकडे प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करते. माजी विद्यार्थी असणाऱ्या जिल्हा न्यायाधीशांनी शाळेची दुरावस्था बघून उपाययोजना करण्याबाबत विनंती वजा सूचना केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यांनी पाहणी करून "तात्पुरती" उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. किमान न्यायाधिशांनी खडसावल्यानंतर तरी महापालिका प्रशासन शाळेच्या रखडलेल्या समस्या सोडणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
--
चौकट
स्थानिक कार्यकर्त्यांच्या दबावापुढे मुख्याध्यापक हतबल
--
लोकप्रतिनिधींसह स्थानिक कार्यकर्त्यांचा दबाव शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक तसेच प्रशासकीय विभागाला नेहमीच सहन करावा लागतो. या परिसरातील आजूबाजूच्या नागरिकांसह गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून शाळेच्या इमारतीची व सीमा भिंतीची नासधूस करण्यात आलेली आहे. शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्यात येतो तो वेळेत उचललाही जात नाही, स्वच्छतागृहांची मोडतोड व दुरावस्था झालेली आहे. अपुरे सुरक्षारक्षक त्यामुळे स्थानिक गुंडांचा नेहेमीच उपद्रव होत असतो. रात्रीच्या वेळी मद्यपींकडून शाळेच्या आवाराचा बिनदिक्कत वापर केला जातो. याकडे महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे.
--
दोन फोटो
०४येरवडा स्कूल एक
०४ येरवडा स्कूल दोन
फोटो ओळ - येरवडा येथील पुणे महापालिकेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयाची झालेली दुरावस्था