महाराष्ट्र शासणाच्या शालेय शिक्षण विभागाने २३ नोव्हेंबर २०२० पासून शाळा सुरु करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ९वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. २७ जानेवारीपासून ५ ते ८ वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या शाळांचे कामकाज कशा पद्ध तीने सुरू आहे. शाळांमधून काही अडचणी आहेत का ? विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळापातळीवर शासनाने दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी होत आहे का? येथील स्वच्छता, पिण्याचे पाण्याची व्यवस्था, सॅनिटायझरचा वापर, विद्यार्थी तपासण्या, सोशियल डिस्टन्सिंग या सर्वांचा आढावा घेण्यासाठी आंबेगांव तालुक्याच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी संचिता अभंग यांनी तालुक्यात शाळा भेटीचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत त्या स्वत: शाळांना भेटी देत असून येथील परीसस्थितीचा आढावा घेत आहेत. आंबेगांव तालुक्याच्या पश्चिम भागातील पंढरीनाथ विद्यालय पोखरी या विद्यालयास त्यांनी नुकतीच भेट देऊन कोविडनंतर सुरू झालेल्या शाळेतील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला व ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाबाबत येणाऱ्या अडचणी विद्यार्थ्याकडून जाणून घेतल्या. नुकत्याच १० वी १२ परीक्षेच्या संभाव्य तारखाही जाहीर झाल्या आहेत. यामुळे अभ्यासक्रम व हाताशी आसणारा कालावधी याचे योग्य नियोजन करून परीक्षेला सामोरे जाण्यासाठी त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांना सूचना केल्या.
डिंभे,पी १ कोविडनंतर सुरू झालेल्या पंढरीनाथ विद्यालय पोखरी या विद्यालयास भेट देऊन आंबेगाव तालुक्याच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी संचिता अभंग यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शाळांतील परिस्थितीचा आढावा घेतला.