सासवड : मागील किरकोळ भांडणाचा राग काढून एका शालेय विद्यार्थ्याला १२ ते १५ जणांनी बेदम मारहाण केली आहे. याबाबत सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषीकेश नंदकुमार जाधव (रा. चांबळी, ता. पुरंदर) याने मारहाण झाल्याची फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी संकेत चंद्रकांत मुसळे, गोट्या भिंताडे (दोघेही रा. भिवडी) आणि विश्वय्या ऊर्फ विश्वास पूर्ण नाव माहीत नाही ( रा. नारायणपूर, ता. पुरंदर) आणि इतर १० ते १२ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आहे. दरम्यान, यातील सर्व आरोपी अद्याप फरार असून, त्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी दिली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक महिन्यापूर्वी यातील फिर्यादी ऋषीकेश जाधव आणि त्याचा मित्र वैभव कोलते (रा. तारादत्त कॉलनी, सासवड) हे दोघे वाघिरे विद्यालयातील क्लासमध्ये असताना वैभवचा धक्का लागल्याने आरोपी चंद्रकांत मुसळे याची वही बेंचवरुन खाली पडली. तर ऋषीकेश हा मागील बेंचवर बसला होता, त्याचा पाय या वहीवर पडला. त्यामुळे संकेत आणि ऋषीकेश यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर सॉरी म्हणत ऋषीकेशने हा वाद मिटविला. मात्र संकेतने त्याच्या मित्रांना बोलावून घेतले. परंतु फिर्यादी ऋषीकेश जाधव हा घरी गेल्याने त्या दिवशी वाद झाला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वाघिरे कॉलेजच्या मुख्य आॅफिससमोर असताना गोट्या भिंताडे आणि विश्वासने, तू संकेत मुसळेशी वाद का घालतो असे म्हणून फिर्यादी ऋषीकेश जाधवला हाताने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्या वेळी कॉलेजचे प्राध्यापक तांबडे आणि प्रा. भोसले यांनी ही भांडणे सोडविली. दरम्यान, दि. १८ रोजी सकाळी ११.३०च्या दरम्यान फिर्यादी ऋषीकेश जाधव आणि त्याचा मित्र रोहन बडधे असे दोघे कॉलेजच्या रस्त्यावरील आनंद प्लाझा या इमारतीच्या मधल्या पॅसेजमध्ये उभे असताना विश्वास हा तिथे आला व तो त्याचा मित्र रोहनशी बोलू लागला. याच्याबरोबर आलेली १० ते १२ मुले (सर्वांनी पुरंदर कॉलेजचा युनिफॉर्म घातलेला होता) त्यांनी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. रोहनला मारहाण करताना तो पळून गेला. त्या वेळी मुख्य आरोपी संकेत मुसळे याने जोरजोरात मारामारा असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या वेळी ऋषीकेश तेथून पळून गेला व त्यांना कराटे शिकविणारी शिक्षिका यांना फोन करून माहिती दिली. कराटे शिक्षिका यांनी सर्व विद्यार्थ्यांना बोलावून घेऊन त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे न ऐकता पुन्हा त्यास मारहाण केली. त्या वेळी ऋषीकेशला चक्कर आल्याने त्यास सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर या ठिकाणी गेल्यावर पुन्हा सर्व आरोपींची दगडफेक केली. याबाबत या सर्वांवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब टापरे करीत आहेत. (वार्ताहर)
सासवड येथे शालेय विद्यार्थ्याला मारहाण
By admin | Updated: January 23, 2017 02:28 IST