पुणे : फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया ( एफटीआयआयने) ने हीरकमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून हिंदी भाषेमधील चित्रपटविषयक पुस्तक लेखनाकरिता कलात्मक शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली आहे.
चित्रपट आणि दूरचित्रवाणी मधील कला, कलात्मकता आणि अभ्यास या संकल्पनेशी संबंधित हिंदीमध्ये पुस्तक लिहू इच्छिणा-यांना अर्ज करण्याची विनंती एफटीआयआयने चित्रपट कलेशी निगडित व्यक्ती, पत्रकार आणि अभ्यासकांना केली आहे. याअंतर्गत जास्तीत जास्त 3 शिष्यवृत्ती देण्यात येतील. विद्यार्थ्यांना हिंदीमध्ये पुस्तके उपलब्ध करून देणें हा या शिष्यवृत्तीचा उद्देश आहे. ज्या व्यक्तीची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाईल त्यांनी ही गोष्ट डोळ्यासमोर ठेवून पुस्तक लिहिणे अपेक्षित आहे. या शिष्यवृत्तीसाठी दरमहा 50,000 रुपये वेतन एका वषार्साठी दिले जाणार आहे. शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या अर्जदारांना मुलाखतीसाठी हजर व्हावे लागेल आणि स्क्रिनिंग कमिटीसमोर सादरीकरण करावे लागेल.
आज विदेशी लेखकांनी चित्रपट आणि दूरचित्रवाणीशी संबंधित लिहिलेली दर्जेदार इंग्रजी पुस्तके उपलब्ध आहेत. परंतु एफटीआयआय मध्ये प्रवेश घेतलेले काही विद्यार्थी इंग्रजी भाषिक नसल्याने त्यांना पुस्तकी शिक्षण घेण्यास अडचणी येत आहेत. हिंदीमध्ये पुस्तके आल्यास त्यांच्या शिक्षणाला दिशा मिळेल, असे एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला यांनी सांगितले.
------------------------------------------------------------------------