सांगवी : राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेने उपलब्ध पाणी पावसाळ्यापर्यंत पुरविण्यासाठी पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. यामुळे दहा दिवसांत दीड हजार एमएलडी पाण्याची बचत झाली आहे. महापालिकेचे नियोजन आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे पाण्याची मोठी बचत होत आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात गेल्या पावसाळ्यात केवळ ऐंशी टक्के पाणीसाठा जमा झाला. त्यातच पाण्याचा उपसा आणि दिवसेंदिवस खालावत जाणारी पाण्याची पातळी यामुळे जुलै महिन्यापर्यंत पाणी पुरविण्यासाठी महापालिकेसमोर आव्हान उभे राहिले. त्यामुळे पहिल्या टप्प्यात दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आली. यामुळे दिवसाला ४५ एमएलडी पाण्याची बचत होत होती. त्यानंतर पुन्हा पाच टक्के कपात वाढविण्यात आल्याने एकूण पंधरा टक्के पाणीकपातीमुळे दिवसाला ७० एमएलडीपाण्याची बचत होऊ लागली. दरम्यान, पवना धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात घटू लागल्याने शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यानुसार महापालिकेने २ मेपासून दिवसाआड पाणीपुरवठ्याची अंमलबजावणी लागू केली. अगोदर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी साडेचारशे एमएलडी उचलले जायचे. मात्र, आता दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे दिवसाला ३०० एमएलडी पाणी उचलले जात आहे. यामुळे दिवसाला दीडशे एमएलडी पाण्याची बचत होत असून, गेल्या दहा दिवसांत दीड हजार एमएलडी पाण्याची बचत झाली आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर आणि योग्य नियोजनामुळे पाण्याची बचत होत आहे. याचा मोठा फायदा शहरवासीयांसाठी होत आहे. सध्याच्या उपलब्ध पाणीसाठ्यात शहरवासीयांची जुलै महिन्यापर्यंत तहान भागविता येऊ शकेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (वार्ताहर)
दीड हजार एमएलडी पाण्याची बचत
By admin | Updated: May 11, 2016 00:27 IST