तळेगाव ढमढेरे : जिथे माणुसकी आहे, तिथे शिवरायांचे अस्तित्व नेहमीच असते. म्हणूनच आधी जिजाऊ वाचवा, नंतरच शिवराय जन्माला येतील, असे उद्गार शिवशाहीर कल्याण काळे यांनी बोलताना काढले. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात शिवशाहीर काळे बोलत होते. संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती उत्साहात साजरी होत असताना तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी समाजापुढे आदर्शवत उपक्रम करून सर्वांचे लक्ष वेधले असून, या ठिकाणी शिवजयंती उत्सव साधेपणाने साजरा केला. शिवप्रतिष्ठान तळेगाव ढमढेरे आयोजित शिवजयंती उत्सव बारा वर्षे अखंडित चालू ठेवला असून, शिवरायांचे जन्मस्थान शिवनेरी येथून ज्योत आणली जाते. शिवाजीमहाराज चौकात भव्यदिव्य शिवप्रतिमेचे पूजन केले जाते. या वेळी नऊ ते एक वाजेपर्यंत शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर ठेवले होते. हरिनामाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. समाजापुढे आदर्श ठरेल अशी ‘माणुसकीची भिंत’ उभारण्याचा निर्णय येथील कार्यकर्त्यांनी घेतला. यामध्ये आपल्याकडील ज्या ज्या टाकाऊ वस्तू असतील त्यामध्ये रद्दी, कपडे, छत्री, रेनकोट, चादर, बेडशीट, चप्पल, बूट, भांडी, पुस्तके, खेळणी, सायकल, अशा वस्तू ते जमा करायच्या आणि गरजवंतांनी हवे ते घेऊन जायचे असा हा उपक्रम आहे. (वार्ताहर)
जिजाऊ वाचवा, नंतर शिवराय जन्माला येतील : काळे
By admin | Updated: March 22, 2017 02:56 IST