उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या माध्यमातून आरोग्य केंद्रास मंजुरी मिळाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र होण्यासाठी वाघळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने मागणी करण्यात आली होती. परिसरातील गरज ओळखून अजित पवार यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यास जागा उपलब्ध करून देण्यास सांगितली होती. त्यानुसार सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप आणि संचालक मंडळाने संचालक मंडळाच्या सभेत मंजुरी घेऊन आरोग्य केंद्रासाठी दीड एकर जागा उपलब्ध करून दिली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र होण्यासाठी सरपंच नंदा सकुंडे, उपसरपंच जितेंद्र सकुंडे, समर्थ ज्ञानपीठचे अध्यक्ष अजिंक्य सावंत, ग्रामपंचायत सदस्य हेमंत गायकवाड, पांडुरंग भोसले, तुषार सकुंडे यांनी पाठपुरावा केला होता.
सोमेश्वरनगर, वाघळवाडी, वाणेवाडी, मुरूम, निंबुत, करंजेपूल, खंडोबाचीवाडी, गरदडवाडी, सोरटेवाडी, चौधरवाडी, मगरवाडी, करंजे, देउळवाडी तसेच वाड्यावस्त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात समाविष्ट करण्यात आली आहेत. १२ गावांचा समावेश असून ३५१८३ इतक्या लोकसंख्येच्या नागरिकांना यामुळे आरोग्य सेवेचा फायदा होणार आहे. होळ येथील आरोग्य केंद्रावर सध्या मुख्य १९ गावांचा भार आहे. सोमेश्वरनगर पासून पंधरा किलोमीटर अंतरावर होळ प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने नागरिकांना जाणे शक्य होत नाही. या ठिकाणी आरोग्य केंद्र मंजूर झाल्याने परिसरातील नागरिकांना आणि सोमेश्वर कारखाना तळावरील ऊसतोड हंगाम काळात जवळपास दहा हजार मजूरांना प्राथमिक उपचार घेता येणार आहे. सोमेश्वरनगर येथे आरोग्य केंद्र मंजूर झाल्याने परिसरातील गावांतील रुग्णांसाठी ते वरदान ठरणार आहे. असे ग्रामपंचायत सदस्य हेमंत गायकवाड यांनी सांगितले.