लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेच्या विविध दवाखाने व रुग्णालयांमधील महत्त्वपूर्ण उणीव बाणेर येथील दोन कोविड रुग्णालयांमधून भरून निघत आहे. या दोन्ही रुग्णालयातील आयसीयू आणि ऑक्सिजन खाटा तसेच व्हेंटिलेटर खाटांमुळे गंभीर रुग्णांकरिताची निकड भरून निघणार आहे.
महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये आणि दवाखान्यांमध्ये कोरोना आपत्तीपूर्वी म्हणजे मार्च २०२० पूर्वी एकूण खाटा १ हजार २०० होत्या. परंतु, कमला नेहरू हॉस्पिटल येथील हृदयरोग विभाग वगळता उर्वरित ठिकाणी कुठेच ‘आयसीयू’, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर खाटांची सुविधा नव्हती़ यामुळे महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणारा रुग्ण गंभीर झाल्यास त्याला ससून सर्वोपचार रुग्णालय अथवा खासगी रुग्णालयाची पायरी चढण्याशिवाय पर्याय नव्हता. गंभीर आजारावरील उपचारासाठी सर्वसामान्य नागरिकांना ‘शहरी गरीब योजनेची’ सवलत घेऊन आजही खासगी रुग्णालयांची वाट धरावी लागते.
कोरोना आपत्तीची चाहुल लागली आणि फेब्रुवारी, २०२० मध्ये साथीच्या रोगाच्या आजारासाठी प्रसिद्ध डॉ. नायडू रुग्णालयात शंभर वर्षानंतर प्रथमच १० आयसीयू खाटा सुुरू झाल्या. कोरोना संकट वाढत गेल्यानंतर महापालिकेच्या अशक्त आरोग्य यंत्रणेला उभारी देण्याची गरज निर्माण झाली. बांधकाम विभागाकडून बांधकाम परवानगी देताना काही ठराविक बांधकामाच्या बदल्यात (आर-७ अंतर्गत) महापालिकेच्या ताब्यात आलेल्या बाणेर येथील दोन सहा मजली इमारती, कोविड आपत्तीत आरोग्य यंत्रणेसाठी कोविड रुग्णालय उभारणीसाठी वरदायी ठरल्या. कोट्यवधी रुपयांचे तयार बांधकाम व ‘सीएसआर’ मधून मिळालेली मदत तसेच लोकप्रतिनिधींचा विकासनिधी यातून आज बाणेर येथील दोन्ही कोविड रुग्णालयांच्या रुपाने ५२३ खाटांची सर्वसुविधांयुक्त आरोग्य सेवा महापालिकेच्या अशक्त आरोग्य यंत्रणेला सलाईन देणारी ठरली आहे़
चौकट १
थेट दुसऱ्या मजल्यावर रुग्णवाहिका
शहरातील कुठल्याही सरकारी अथवा खासगी रुग्णालयात गंभीर रुग्णाला रुग्णवाहिकेतून आणल्यावर स्ट्रेचरवरून आयसीयू विभागात नेले जाते. बाणेर येथील सर्व्हे नंबर ३३ मधील नवीन कोविड रुग्णालयात पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर रुग्णवाहिकेतून आणलेला गंभीर रूग्ण थेट ‘आयसीयू’त जाऊ शकणार आहे. कारण या रुग्णालयात पहिल्या व दुसऱ्या मजल्यापर्यंत ‘कार लिफ्ट’ असून ती ‘आयसीयू’ला जोडलेली आहे. पहिल्या व दुसऱ्या मजल्यापर्यंत रुग्णवाहिका जाऊ शकणारे हे पुण्यातील पहिलेच रुग्णालय ठरले आहे.
चौकट २
रुग्णालय ‘कोविड’चे पण सर्व आरोग्य सेवांसाठी
“बाणेर येथील दोन कोविड रुग्णालये कोरोना संकटासाठी उभारले असले तरी कोरोनानंतरही ती महापालिकेच्या सेवेतच असणार आहेत. त्यामुळे महापालिकेला आता स्वत:च्या रुग्णालयात गंभीर रुग्णांकरिता आयसीयू, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर खाटांची सुविधा देता येणार आहे,” असे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले. या नव्या रुग्णालयात ६२ आयसीयू आणि १४७ ऑक्सिजन अशा २०९ खाटा आहेत. या ठिकाणी प्रत्येकी एक हजार ५० लिटर प्रतिमिनिट क्षमतेचे दोन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प व ऑक्सिजन टाक्या उभारल्या आहेत. रुग्णालयाच्या उभारणीकरता १२ कोटी रुपये खर्च आला. महापालिकेला तेवढ्याच किमतीची ही इमारत आर-७ मध्ये मिळाली, असे वाघमारे यांनी सांगितले.
-------------------
फोटो मेल केला आहे़