काठापूर बुद्रुक मधून अवसरी लाखणगाव हा रस्ता जातो.या रस्त्याचे काम मंचर शिरुर रस्त्यापासून पांडुरंगवस्ती, शेटेवस्ती मुक्ताईनगर या वाडीवस्तीतुन जाते. मागील दहा वर्षापासून या रस्त्याचा प्रश्न रेंगाळला होता. या रस्त्याच्या रेंगाळलेल्या कामांमुळे येथील शेतकऱ्यांना घरी जाण्यासाठी तसेच शेतमाल काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या रस्त्याचे काम व्हावे अशी सगळ्यांची इच्छा होती. परंतु या रस्त्याची मूळ जागा निश्चित होत नसल्याने प्रश्न सुटत नव्हता. अतिशय वेड्यावाकड्या स्थितीत हा रस्ता वापरात होता. अनेक वर्षापासून हा प्रश्नप्रलंबित होता. कायम स्वरूपी तोडगा निघुन हा रस्ता बनवण्यासाठी सदर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीची मोजणी करून रस्त्याची जागा निश्चित करण्याचे ठरले. त्यानुसार येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या दोनशे एकर शेतीची मोजणी करण्यात आली. ही मोजणी केल्यानंतर सदर रस्त्याचे स्थान निश्चित झाले. त्यानंतर शेतकऱ्यांची घरे, विहीरी या गोष्टींचा विचार करून या रस्त्याची आखणी करण्यात आली.अनेक शेतकऱ्यांची पिके या रस्त्यावर येत होती. ही पिके काढुन रस्ता मोकळा करण्यात आला.या रस्त्याचे काम कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून पंचवीस पंधरा निधीतुन सुरू झाले आहे. याची सुरुवात जेष्ठ नागरिक दशरथ जाधव,सरपंच अशोक करंडे, उपसरपंच विशाल करंडे, ग्रा.पं.सदस्य अर्चना जाधव, शांताराम जाधव, बाबाजी करंडे, अनिल जाधव, लाला जाधव यांच्या उपस्थितीत झाली.
काठापुरला रस्त्याच्या कामाला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:12 IST