आढले बुद्रुक : मावळ तालुक्यामधील ग्रामीण भागातील गावांना जोडणारे अनेक महत्त्वाचे मार्ग आहेत. आंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ असे मावळचे प्रामुख्याने तीन विभाग आहेत. पावसाचे प्रमाण दर वर्षी जोरदार असते. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक गावाला जोडणाऱ्या रस्त्यांची सध्या दुरुस्ती सुरू आहे. अनेक तुंबलेल्या मोऱ्या साफ करण्याची आवश्यकता आहे. पाणी वाहून नेणारी मोरी तुंबल्याने पाणी रस्त्यावरून जाते. परिणामी रस्ता खराब होतो. अनेक रस्ते तयार झाले असून, काहींचे खडीकरण, डांबरीकरण सुरू आहे. परंतु ठेकेदाराने रस्ता पूर्ण केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी कर्तव्य विसरून जातात. अनेक रस्त्यांवर असणाऱ्या मोऱ्या, त्यावरील दोन्ही बाजूंना असणाऱ्या भिंती यांची पडझड झाली आहे. कित्येक वर्षांपासून साधी डागडुजीही करण्यात आलेली नाही. अनेक मार्गांवरील मोऱ्या मातीने व कचऱ्याने भरल्या असून, पावसाचे पाणी त्यामधून वाहून जाऊ शकणार नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी गटारे जाम झाली असून, डोंगर-दऱ्यांमधून आलेल्या पाण्याच्या प्रवाहाला दिशा देण्याची गरज आहे. हे पाणी योग्य दिशेला वळविले नाही तर पाणी रस्त्यावर साचून राहते व रस्ता खराब होऊन खड्डे पडतात. बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवरील मोरीच्या भिंती पडल्या असून, रस्तादेखील खचला आहे. अनेक ठिकाणी असणाऱ्या ओढ्या-नाल्यांवर दोन-चार मोरींची आवश्यकता असून, त्या ठिकाणी एक किंवा दोन मोरी असल्यामुळे पावसाळ्यामध्ये पाणी रस्त्यावर येते. प्रशासनाचा वचक नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी जमीनदारांनी जमिनीची उंची वर-खाली केल्यामुळे डोंगर-दऱ्यांमधून येणाऱ्या पाण्याला जाण्यासाठी जागाच उरली नाही. (वार्ताहर)
रस्त्याची दुरुस्ती; मोऱ्या मात्र जैसेथे
By admin | Updated: June 9, 2014 05:19 IST