पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातून आभासी बैठक घेत पुण्यातील मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. कामाची गती वाढवण्याची सूचना देत या कामामुळे नागरिकांची किंवा वाहतूकीची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले.
महामेट्रो कंपनीचे अधिकारी पुण्यातून आभासी पद्धतीने या बैठकीत सहभागी झाले होते. पुणे महानगर विकास प्राधिकरणचे (पीएमआरडीए) आयुक्त सुहास दिवसे मुंबईत असल्याने बैठकीत प्रत्यक्ष सहभागी झाले. पीएमआरडीकडून शिवाजीनगर ते हिंजवडी अशी मेट्रो होत आहे. यासाठी आवश्यक सर्व जागांचे संपादन झाले आहे. मेट्रोच्या खाबांसाठी खड्डे घेतले जात आहेत. कास्टिंग यार्डच्या कामालाही सुरूवात झाली असल्याची माहिती दिवसे यांनी दिली.
महामेट्रोचे संचालक (नियोजन) रामनाथ सुब्रम्हण्यम यांनी वनाज ते गरवारे महाविद्यालय व पिंपरी चिंचवड ते दापोडी या प्राधान्य मार्गाच्या कामाची माहिती दिली. मेट्रो मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले असून आता या प्राधान्य मार्गांवरील स्थानकांचे काम सुरु असल्यचे त्यांनी सांगितले.