किवळे : पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील देहूरोड -निगडी दरम्यानच्या संपूर्ण रस्त्याच्या दुतर्फा बाजूपट्ट्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याबाबत तीन आठवड्यांपूर्वी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत मुंबईत झालेल्या बैठकीत निर्णय झाला असताना काम ठप्प झाले असून, सद्य:स्थितीत बाजूपट्ट्यांच्या दुरवस्थेकडेही ठेकेदाराचे दुर्लक्ष होत असल्याने गैरसोय होत असून, अपघातांना निमंत्रण मिळत आहे. महामार्गावरील देहूरोड ते निगडी दरम्यानच्या ६.३ किमी लांबीमधील रस्त्याच्या संरक्षक बाजूपट्ट्या खचल्या असल्याने देहूरोडला पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत निर्णय झाल्यानुसार रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी निगडी ते देहूरोड दरम्यानच्या दुपदरी रस्त्यावर होणारे अपघात रोखण्यासाठी महामार्गाची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदाराला ( म्हैसकर इन्फ्रा. प्रा. लि.) पाच जूनला पत्र पाठवून निगडी ते देहूरोड दरम्यानच्या ६.३ किमी लांबीमधील बाजूपट्ट्या खचल्या असून, समतल नसल्याचे निदर्शनास आणून दिले असून, सदर भागातील बाजूपट्ट्यांची दुरुस्ती निविदा तरतुदीनुसार व भारतीय रस्ते काँग्रेस ( आयआरसी) यांच्या नियमानुसार घेऊन अहवाल द्यावा, तसेच देहूरोड गाव भागातील सातशे मीटर भागातील दोन्ही बाजूंचे मजबुतीकरण व डांबरीकरण करून घ्यावे, बाजूपट्ट्यांचे काम पूर्ण न केल्यास होणाऱ्या अपघातास व भागातील नागरिकांच्या रोषास जबाबदार राहणार नाही, याची संपूर्ण जबाबदारी त्यांची राहणार असल्याचे लेखी दिले होते. (वार्ताहर)मात्र, संबंधित कामे सुरू न केल्याने सोमाटणे येथील टोलवसुली बंद आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी आंदोलनाची दखल घेत नऊ जूनला देहूरोड भागात संबंधित ठेकेदाराने सातशे मीटर भागातील दोन्ही बाजूंचे मजबुतीकरण व डांबरीकरण सुरू केले होते. सदर काम गेल्या आठवड्यात पूर्ण झाले असून, देहूरोड ते निगडीदरम्यानच्या उर्वरित साडेपाच किलोमीटर लांबीतील बाजूपट्ट्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामासंदर्भात नऊ जूनला रस्ते विकास महामंडळाच्या मुंबई येथील कार्यालयात सबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी, आंदोलकांचे प्रतिनिधी यांची बैठक घेतली होती. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार देहूरोड ते निगडी दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात बाजूपट्ट्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण सातशे मीटरचे काम करण्याबाबत आदेश दिलेले असून, उर्वरित ५.६ किलोमीटर लांबीतील बाजूपट्ट्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यास सहव्यवस्थापकीय संचालक एस. एम. रामचंदानी यांनी मंजुरी दिली असून, याबाबत तातडीने आदेश काढण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. (वार्ताहर)
महामार्गावरील दुरुस्तीचे काम ठप्प
By admin | Updated: June 30, 2015 23:26 IST