पुणे : शासनातर्फे नवीन नाट्य निर्मितीसाठी संस्थाना अनुदान देण्याची योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत कार्य करणारी नाट्य परीक्षण समिती बरखास्त केली होती. मात्र नवीन वर्षात समितीच्या पुनर्रचनेला मुहूर्त लागला असून, समितीच्या २२ सदस्यांमध्ये पुण्याच्या विनिता पिंपळखरे आणि प्रकाश पायगुडे या दोघांची वर्णी लागली आहे.
शासनाकडून नाट्यकलेला प्रोत्साहन मिळावे याकरिता व्यावसायिक, संगीत आणि प्रायोगिक अशा तिन्ही माध्यमात नवीन नाटकांची निर्मिती करणाऱ्या नाट्य संस्थांना अनुदान दिले जाते. या नाटकांचे परीक्षण करून समिती अनुदानासाठी संस्थांची माहिती शासनाला कळवते. मात्र नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर जुन्या समित्या आणि मंडळ बरखास्त केली जातात. त्यानुसार नाट्य परीक्षण समिती बरखास्त करण्यात आली होती. शासनाने २२ जानेवारी रोजी या समितीची पुनर्रचना केली आहे. यामध्ये लेखिका आणि दिग्दर्शक विनिता पिंपळखरे आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रकाश पायगुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय समितीत शफाअत खान, सविता मालपेकर, विजय गोखले, अशोक समेळ, पुरुषोत्तम बेर्डे, शोभा बोल्ली, आनंद कुलकर्णी, संजय देवळाणकर-पाटील, समीर इंदुलकर, संदीप जंगम, कौस्तुभ सावरकर, सचिन शिंदे, श्यामनाथ पुंडे, नरेश गडेकर, विलास गोविंद कुलकर्णी, उज्ज्वल देशमुख, आसावरी तिडके, संजय उबाळे, शंभू पाटील यांची समितीमध्ये वर्णी लागली आहे.
दरम्यान, या समितीमध्ये लेखक, कलाकार आणि दिग्दर्शक यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र एकाही निर्मात्याचा सहभाग नसल्याबाबत मराठी व्यावसायिक निर्माता संघाने नाराजी व्यक्त केली आहे.