लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी काळभोर : येथील पेट्रोलियम कंपन्यांच्या वाहतूकदारांनी पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करताना चुकीच्या गोष्टी केल्यास गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिला.
थेऊर फाटा (ता. हवेली) येथे गेल्या आठवड्यात पेट्रोल वाहतूक करणाऱ्या टँकरला शाॅर्ट सर्किट मुळे आग लागली होती. या संदर्भात पेट्रोलियम कंपन्यांचे आधिकारी, त्यांचे वाहतूकदार व लोणी काळभोर पोलीस यांची संयुक्त बैठक मंगळवारी हिंदूस्थान पेट्रोलियम कंपनीमध्ये झाली. यावेळी सुरज बंडगर बोलत होते. यावेळी हिंदुस्तान पेट्रोलियमचे वरिष्ठ प्रबंधक अमर बागडे, सिद्धार्थ गोगोई, अरुण भिसेकर, भारत पेट्रोलियमचे प्रबंधक अजय गायकवाड, कल्पना हेडाऊ आदी उपस्थित होते. यावेळी इंडियन ऑइल कंपनीचे कुठलेही आधिकारी उपस्थित नव्हते.
या बैठकीत टँकर भरल्यानंतर ज्या पंपाचा माल आहे त्या पंपावर कुठेही न थांबता टँकरने सरळ जावे असा निर्णय घेण्यात आला. जे वाहतूकदार नियम पाळणार नाहीत त्यांच्या वर कारवाई करण्यात येईल. सर्व वाहतूकदार कंपनीने ठरवून दिलेले नियम पाळतील असे आश्वासन यावेळी वाहतूकदारांनी दिले. थेऊर फाटा येथे घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याची दक्षता सर्व वाहतूकदारांनी घ्यावी अन्यथा संबंधितांवर कडक कायदेशीर करण्यात येईल असा खणखणीत इशारा सुरज बंडगर यांनी यावेळी दिला.