राजगुरुनगर : राजगुरुनगर नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीसाठी १८ प्रभागांची आरक्षण सोडत आज अतिशय उत्सुकतेच्या वातावरणात पार पडली. या सोडतीमध्ये गावातल्या अनेक दिग्गज राजकारण्यांचे प्रभाग राखीव झाल्याने नगर परिषदेत अपवाद वगळता बहुतांश नवीन चेहऱ्यांचे सदस्यमंडळ असेल, हे या सोडतीवरून स्पष्ट झाले. प्रथम नगराध्यक्ष बनण्याची इच्छा बाळगून असलेल्या धुरिणांच्या आकांक्षांवर या सोडतीने पाणी पडले.नगरपरिषदेच्या सभागृहात खेडचे उपविभागीय अधिकारी हिंमतराव खराडे आणि तहसीलदार व प्रशासक प्रशांत आवटे यांनी सकाळी ११ वाजता आरक्षण सोडतीस प्रारंभ केला. प्रचंड उत्सुकता असल्याने कार्यकर्त्यांनी सभागृह खचाखच भरले होते. बरणीमध्ये असलेल्या प्रभागांच्या चिठ्ठ्या एक लहान मुलगी काढत होती. स्वत: उपविभागीय अधिकारी प्रभागाचा अंक जाहीर करीत होते आणि प्रभागाचा क्रमांक जाहीर होताच क्षणात इच्छुकांचे सुस्कारे सुटत होते किंवा जल्लोष होत होता. अवघ्या काही मिनिटांमध्ये दिग्गजांचे नशीब पालटले तर काहींचे नशीब बलवत्तर ठरले.माजी सरपंच अतुल देशमुख, कैलास सांडभोर, प्रदीप कासवा, अर्चना चावरे, सुवर्णा कहाणे, चारुशीला सांगडे, माजी सदस्य सुरेश कौदरे, कांतीलाल गुगळे, बाळासाहेब कहाणे, मंगेश गुंडाळ, वैभव घुमटकर, सखुबाई डोळस, अश्विनी कुंभार, संगीता कहाणे, उमा वाघ आदींचे संभाव्य प्रभागांमध्ये त्यांना अनुकूल आरक्षण आले नाही, त्यांना आता वेगळे प्रभाग शोधावे लागतील. तर माजी सरपंच हिरामण सातकर, माजी उपसरपंच रेवण थिगळे, सुरेखा क्षोत्रीय, अरविंद गायकवाड, कल्पना सांडभोर, ऊर्मिला सांडभोर, किशोर ओसवाल, शुभांगी रावळ आदींना त्यांच्या संभाव्य प्रभागांमध्ये अनुकूल आरक्षण आले आहे.याशिवाय नव्याने इच्छुक असलेल्यांमध्येही ‘कही खुशी कही गम’ अशी परिस्थिती आहे. पडाळवाडी आणि नव्याने समाविष्ट झालेला राक्षेवाडीचा काही भाग, पाबळ रस्त्याचा नवीन प्रभाग आणि थिगळस्थळाचा काही भाग व पांडुरंगनगर असलेला प्रभाग हे तीन प्रभाग सर्वसाधारण राहिल्याने या भागातील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. (वार्ताहर)
राजगुरुनगरला दिग्गजांचे प्रभाग राखीव
By admin | Updated: January 21, 2015 23:04 IST