पुणे : जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी सोडणे आवश्यक असल्याने महापालिकेने आणखी पाणी १० ते १५ टक्के पाणीकपात करावी, अशी विचारणा पाटबंधारे विभागाकडून मागील आठवड्यात करण्यात आली होती. त्यानुसार, महापालिकेला प्रत्येक आठवड्यात एक दिवस पाणी बंद ठेवण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. याला महापालिका प्रशासनाने नकार दिला असून, एक दिवस पाणी बंद ठेवल्यास शहराचा पाणीपुरवठा पुढील तीन दिवस विस्कळीत होत असल्याने प्रशासनाकडून नकार देण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी लोकमतशी बोलताना दिली.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रणालीत जेमतेम ५० टक्के पाणीसाठा असल्याने महापालिकेकडून शहराला दिवसाआड पाणी देण्यात येते. त्यामुळे शहरातील प्रत्येक भागाला आठवड्यात तीनच दिवस आणि काही तासच पाणी दिले जाते. शहराचा भौगोलिक आकार आणि महापालिकेची वितरणव्यवस्था लक्षात घेता, दिवसाआड पाणी देत असताच; पुन्हा एक संपूर्ण दिवस पाणी बंद ठेवल्यास वितरण नलिका भरण्यास उशीर लागेल, तसेच त्यात तांत्रिक बिघाड होण्याचे प्रमाण वाढून पुढे एखाद्या भागाला तीन ते चार दिवस पाणी देणे अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे अस्तित्वातील कपात आणखी वाढविणे शक्य नसल्याचे पालिका प्रशासनाकडून पाटबंधारे विभागाला कळविण्यात आले आहे.
जादा पाणीकपातीला नकार
By admin | Updated: January 13, 2016 03:47 IST