सासवड : “वाचनामुळे माणसाची विचार क्षमता वाढते, कल्पनाशक्ती वाढते, ज्ञानात भर पडते. क्रमिक पुस्तकांशिवाय आवांतर विषयांची पुस्तके वाचल्याने आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदवतात. वाचनाने माणूस बहुश्रुत बनतो. पुस्तक हे आपला चांगला मित्र असतो, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुषमा भोसले केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे वाघिरे महाविद्यालयात केरळ राज्यातील ग्रंथालय चळवळीचे जनक पी. एन. पणिक्कर यांची पुण्यतिथी (१९जून) वाचन दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने ग्रंथपाल प्रा. दत्तात्रय संकपाळ यांचे वाचन साहित्य आणि ग्रंथालय परिचय या विषयावर ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुषमा भोसले होत्या. प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रवीण ससाणे यांनी केले.
डॉ. प्रवीण ससाणे यांनी पी. एन. पणिक्कर यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचनाचे महत्त्व वाढावे हा या वाचन दिनाचा उद्देश असल्याचे सांगितले.
आपल्या व्यक्तिमत्वाच्या अंतर्बाह्य विकासासाठी, जीवन समृद्ध घडवण्यासाठी, माहिती तसेच ज्ञानप्राप्तीसाठी आपण नियमित वाचन केले पाहिजे. ग्रंथालयसह आज अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध असून त्याचा वाचनासाठी वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन ग्रंथपाल प्रा. दत्तात्रय संकपाळ यांनी केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संपत जगदाळे, डॉ. सुभाष वाव्हळ, आय आय. क्यू. सी. प्रमुख डॉ. संजय झगडे, विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी डॉ. रोहित ढाकणे, प्रा. अनिल झोळ आदी उपस्थित होते.
विद्यार्थी प्रतिनिधी ऋतुजा कड हिने वाचन प्रतिज्ञेचे वाचन केले. सूत्रसंचालन डॉ. नाना झगडे यांनी केले तर रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. किशोर लिपारे यांनी आभार मानले.