राजगुरुनगरकर तापले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 01:33 AM2017-08-18T01:33:45+5:302017-08-18T01:33:47+5:30

शहर व परिसरात डेंगीची व चिकुनगुनियाची साथ पसरली आहे.

Rajgurunagarkar hot! | राजगुरुनगरकर तापले!

राजगुरुनगरकर तापले!

Next

राजगुरुनगर : शहर व परिसरात डेंगीची व चिकुनगुनियाची साथ पसरली आहे. गेल्या पंधरा दिवसांत ४०० नागरिकांना डेंगीची लागण झाली आहे. रोज नवीन डेंगीचे रुग्ण सापडत असल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील कचरा योग्य पद्धतीने उचलला जात नाही. तसेच, सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने रोगराई पसरत आहे. नगर परिषद व आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
पावसाळा सुरूअसून शहरातील विविध भागांमध्ये अद्यापही औषध फवारणी, धुरळणी करण्यात आलेली नाही. तसेच, रस्त्यात अनेक ठिकाणी कचºयाचे ढीगही दिसत आहेत. पाण्याची साचलेली डबकी यामुळे रोगराईचे प्रमाण वाढत आहे. सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
राजगुरुनगर शहरात राक्षेवाडी, पाबळ रोड, पडाळवाडी तसेच ग्रामीण भागातही या डेंगीचे रुग्ण आढळत आहे. नगर परिषद तसेच आरोग्य खाते त्यांना याबाबत सोयरसूतक नसल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी गटारे उघडी असून पाण्याची डबकी साचली आहे. यावर कुठलीही उपाययोजना होत नाही.
गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात दररोज लहान मुले, नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक अशा १० जणांना डेंगी व चिकुनगुणियाची लागण झाली असल्याचे निदान होत आहे. शहरातील खासगी दवाखान्यात डेंगीचे रुग्ण आढळून येत आहे. गेल्या १५ दिवसांत ४०० हून अधिक रुग्णांना डेंगीची लागण झाली असल्याचे डॉक्टर एम. बी. भुजबळ, डॉ. दिलीप बाबळे, डॉ. खडके यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. याबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
डेंगीचे डास स्वच्छ पाण्यात होतात, घरांमध्ये राहतात व दिवसा चावतात. शाळेत, आॅफिस इत्यादी ठिकाणी डास चावत असतील तर तिथे डासांचा बंदोबस्त करायला हवा.
काळजी म्हणून घरातील कुंड्या, फ्रीजच्या खालील ट्रे, फुलदाणी, एअर-कंडिशनर, तसेच उघड्यावरील टायर, फुटके डबे, कौले, करवंटी, गच्चीवर पाणी साठण्याच्या जागा, झाकण उघडे राहिलेल्या पाण्याच्या टाक्या इत्यादीत पाणी साठल्यास तिथे डेंगीचे डास होतात.
>डेंगीचे डास घरात, घराभोवती होतात. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त नागरिकांनीच करायला हवा. सर्व डॉक्टर्सनी डेंगीच्या रुग्णांबाबत नगर परिषदेला कळवले पाहिजे. म्हणजे डेंगी झालेल्यांच्या व त्यांच्या शेजारच्यांच्या घरात, डासनाशकाची फवारणी करणे गरजचे असल्याचे पाबळ रोड येथील डॉक्टर महेश टाकळकर यांनी सांगितले.

Web Title: Rajgurunagarkar hot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.