खोर : मागील काही वर्षांपूर्वी झाडांच्या विषय अनेकांच्या मनामध्ये एक प्रकारची झाडांच्या विषयी नैराश्याची वागणूक मिळताना दिसत होती. अनेक ठिकाणी वृक्षतोड करणे...झाडे न लावणे....आहे त्या झाडांचे संगोपन न करणे असे कित्येकदा असे चित्र पाहावयास मिळत होते. मात्र, दौंड तालुक्यात ‘एक मित्र-एक वृक्ष ग्रुप’ स्थापन झाला आणि या तालुक्याला या ग्रुपच्या माध्यमातून वृक्षांना एक प्रकारची पालवीच फुटली गेली.
‘एक मित्र-एक वृक्ष’ हा ग्रुप सन २१ जून २०१४
स्वर्गीय मंगलबाई मुथा यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण व नेत्रदान कार्याला सुरुवात करून या दिवशी या ग्रुपची दौंड तालुक्यात स्थापन झाला आणि आजपर्यंत सात वर्षांच्या कालावधीत या ग्रुपने तब्बल १२ हजार झाडे लावून आज दौंड तालुक्यात हरित चळवळ उभी केली आहे. ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत मुथा म्हणाले की, सामाजिक उपक्रमांची जाणीव प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण व्हावी आणि निसर्गाच्या कुशीतील वातावरण या तालुक्यात निर्माण व्हावे या हेतूने हा उपक्रम आम्ही चालू केला आहे. आजपर्यंत १ लाख बियांचे बीजरोपण केले असून तब्बल १२ हजार झाडे या ग्रुपने लावली गेली आहेत.
देऊळगाव गाडा, पडवी, बोरीपारधी, नारोळी, उंडवडी, वरवंड,वाखारी, आंबेगाव, या गावात वृक्षारोपण केले गेले आहे. बांधावरील शेती, वृक्षारोपण स्पर्धा, यातून पंधरा हजारापेक्षा जास्त झाडे लावली, विविध प्रकारचे देशी वृक्ष आयुर्वेदिक वृक्ष लावण्यावरती भर दिला गेला. आतापर्यंत माणसाला ऑक्सिजन व फळे मिळावी या उद्देशाने वृक्षारोपण केले जात होते. ग्रुपच्या माध्यमातून प्रथमच पक्ष्यांना नैसर्गिकरीत्या अन्न मिळावे या दृष्टिकोनातून वृक्षारोपणावर भर दिला गेला. सीडबॉल, बीजरोपण या उपक्रमाच्या माध्यमातून लाखो बिया निसर्गामध्ये पेरण्याचे काम ‘एक मित्र-एक वृक्ष ग्रुप’ने केले आहे. आज या बियांमधुन अंकुर फुटून रोपांमध्ये रूपांतर झाले आहे.
दौंड तालुक्यातील ‘एक मित्र-एक वृक्ष ग्रुप’ आपल्या सहकारी वर्गांच्या माध्यमातून जणू निसर्गाला साद घालत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. (छायाचित्र : रामदास डोंबे, खोर)