पिंपरी : शहरातील काही भागात बुधवारी पावसाने हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटासह काही भागात दुपारी तीनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. वादळासह पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. उकाड्याने हैराण नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.बुधवारी दिवसभर वातावरण ढगाळ होते. दुपारी ढग दाटून येऊन परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले. वादळी वारा सुरू झाला. उपनगरासह विविध भागात पावसाने दुपारी तीनच्या सुमारास कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने लोकांची तारांबळ उडवली. विशेषत: दुचाकीचालकांना कसरत करावी लागली. अचानक आलेल्या पावसाने पादचाऱ्यांना भिजवले. पथारीवाले, हातगाडी, विक्रेत्यांची गैरसोय झाली. पावसामुळे काही सखल भागात पाणी साचले. रस्ते ओले झाले. बालगोपाळांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला. यामुळे सायंकाळनंतर वातावरणात गारवा निर्माण झाला. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनी या वातावरणाचा आनंद घेतला. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार पुण्यात येत्या दोन-तीन दिवसांतही दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह व विजांच्या लखलखाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
पावसाची हजेरी; नागरिकांची तारांबळ
By admin | Updated: April 7, 2016 00:33 IST