पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील शिल्लक असलेल्या पाण्याची स्थिती गंभीर असल्याने व १५ जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन शहरात आणखी पाणीकपात करावी लागणार आहे. यासाठी महापालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन १५ दिवसांत पालकमंत्र्यांसह बैठक घेऊन पाणीकपातीचा निणर्य घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले. शहरात सध्या दिवसाआड पाणी येत असल्याने त्यात आणखी पाणीकपात होणार असल्याने पुणेकरांच्या अडचणीत भर पडणार आहे.या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरणात शिल्लक असलेल्या पाणीसाठ्याची स्थिती बिकट आहे. शासनाच्या निर्देशानुसार सध्या धरणांमध्ये शिल्लक असलेल्या पाण्यासाठ्याचे १५ जुलैपर्यंत नियोजन करावे लागणार आहे. मात्र, त्यानंतरही पाऊस न पडल्यास पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे. याबाबत राव यांनी सांगितले, की जानेवारीअखेरपर्यंत पाणीकपातीचे सर्व नियोजन करावे लागणार आहे. मे-जूनमध्ये जास्तीची पाणीकपात करण्यापेक्षा आतापासूनच पाणीकपातीत थोडी वाढ करावी लागणार आहे. खडकवासला प्रकल्पातून पुणे शहरासहच दौंड, इंदापूर व पुरंदर नगर परिषदेला पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या येथेदेखील पिण्याची पाण्याची स्थिती गंभीर आहे. यामुळे पुणे शहराबरोबरच या परिसरालाही पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. पिण्याच्याच पाण्याची परिस्थिती बिकट असल्यामुळे शेतीला आता आवर्तन देणे शक्यच नसल्याचे राव यांनी स्पष्ट केले.मुळशी धरणातून एक टीएमसी पाणी घेण्याचा प्रयत्नपाण्याची गंभीर स्थिती लक्षात घेता, मुळशी धरणातील एक टीएमसी पाणी पुणे शहरासाठी मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत लवकरच पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासोबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. या संदर्भात टाटा प्रशासनाशी बोलणे झाले असून, त्यांनी पाणी देण्यास अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळे शहरातील पाणीकपात कशी केली जाईल, याबाबत सर्व गोष्टींचा आढावा घेऊन स्वतंत्र आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. औद्योगिक, टाऊनशिपची गरज व पाण्याचे बाष्पीभवन कीती होते या सर्व बाबींचा विचार करून किती पाणीकपात करायची, हे ठरविले जाईल. पाण्याची उपलब्धता व पाणीसाठे यांवर आधारित पाणीकपात केली जाईल, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले.
पुण्याच्या पिण्याच्या पाण्यावर संक्रांत
By admin | Updated: January 13, 2016 03:48 IST