सांगली : चपळता व अचूकतेचा सुरेख संगम साधत पुणे जिल्ह्याच्या खेळाडूंनी राज्यस्तरीय योगासन स्पर्धेवर वर्चस्व मिळविले. सत्तावीस गुणांची कमाई करत पुणे जिल्ह्याने सर्वसाधारण विजेतेपद आपल्या नावे केले, तर अमरावतीस सोळा गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. कुपवाड (ता. मिरज) येथील नवकृष्णा व्हॅली क्रीडा संकुलाच्या सभागृहात या स्पर्धा पार पडल्या. हिमालया योग आॅलिम्पियाड असोसिएशन व सूरज स्पोर्टस् फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बारा जिल्ह्यातील दिडशेपेक्षा अधिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी तानाजी घार्गे होते. नाईक म्हणाले, योगासन हा अस्सल भारतीय खेळ आहे. सर्वांगाचा व्यायाम या खेळात घडतो. सांगलीत राष्ट्रीय पातळीवर योगासन स्पर्धा घेण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू. बक्षीस वितरण सूरज फौंडेशनचे सचिव एन. जी. कामत यांच्याहस्ते झाले. राष्ट्रीय प्रशिक्षक दीपक सावंत यांनी संयोजन केले. काजल काळे यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत सावंत यांनी स्वागत केले.
योगासन स्पर्धेत पुण्याला विजेतेपद
By admin | Updated: February 2, 2015 00:14 IST