पुणे : महापालिकेचा वाढता विस्तार लक्षात घेऊन शहराला खडकवासला धरणातून पुणेकरांच्या हक्काचे १६ टीएमसी पाणी मिळायलाच पाहिजे, अशी मागणी माजी आमदार व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी यांनी केली आहे. मोहन जोशी यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाने गेली काही वर्षे पुणे शहराला त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे, यासाठी संघर्ष केला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या आंदोलनाची दखल घेऊन तेव्हा १३५० एमएलडीहून अधिक पाणी पुणे शहराला देऊ, असे आश्वासन दिले होते.
महाराष्ट्रात सत्ता असताना पुणेकरांना हक्काचे पाणी देण्याची संधी भाजपला होती पण, त्या मागणीकडे कधी गांभीर्याने पाहिले नाही आणि निर्णयही घेतले नाहीत. सत्ता असताना पुणेकरांच्या तोंडाला पाने पुसली. आता मात्र विरोधी बाकांवर बसल्यावर पुणेकरांना न्याय्य हक्काचे पाणी मिळावे याची आठवण भाजपचे खासदार गिरीश बापट आणि आमदारांना झाली. हा दुटप्पीपणा असल्याची टीका मोहन जोशी यांनी केली आहे. मात्र, काँग्रेस पक्ष आपल्या मागणीवर पहिल्यापासूनच ठाम असून त्याबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, असे जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.