पुणे : पावसाने अद्याप म्हणावी तशी ''बॅटिंग'' सुरू केलेली नसल्याने शेतकऱ्यांना चिंता लागून राहिलेली आहे. मात्र, खडकवासला धरणसाखळीमध्ये पुरेसे पाणी असून मागील वर्षीच्या तुलनेत दोन टीएमसी पाणीसाठी वाढला आहे. मागील वर्षी जुलैमध्ये ९.४७ टीएमसी पाणीसाठा होता. तर आजमितीस ११.०३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच भामा आसखेड योजनेचे पाणी मिळत असल्याने पूर्व भागालाही दिलासा मिळालेला आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीमध्ये पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणांचा समावेश आहे. या सर्व धरणांची पाण्याची साठवण क्षमता ३१ टीएमसी आहे. यामधील उपयुक्त पाणीसाठा २९.५० टीएमसी आहे. शहरासाठी सुमारे साडे अकारा टीएमसी पाणीसाठा मंजूर आहे. मात्र, पालिकेकडून प्रत्यक्षात १६ ते १७ टीएमसी पाणी उचलण्यात येते. यंदा पाऊस समाधानकारक न झाल्याने चिंता व्यक्त केली जात होती.
मागील वर्षी पाऊस डिसेंबरपर्यंत लांबल्याने धरणात अ २०.०२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होते. तर, जून अखेर पर्यंत पालिकेस प्रती महिना दिड टीएमसी प्रमाणे ६ ते ७ टीएमसी पाणी मिळाले.
शहराच्या विविध भागात नागरिकांना कमी दाबाने पाणी येणे, पाणीच न येणे, टँकरने पाणी पुरवठा सुरु असणे अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाजीनगरसारख्या मध्यवस्तीतील पाणी प्रश्नही अद्याप मार्गी लागलेला नाही. उन्हाळयात धरणातील पाणीसाठा कमी होतो. विशेषत: एप्रिल आणि मे महिन्यात शहरातील पाण्यात कपात केली जाते. यंदाही हा शिरस्ता कायम ठेवण्यात आला होता. दरम्यान, धरणात पुरेसा पाणी साठा असल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.
====
खडकवासला धरणसाखळीमधील पर्जन्यमान व पाणीसाठा
धरण। १ जून पासून पर्जन्यमान। धरणातील पाणीसाठा। टक्केवारी
खडकवासला। २७७। ०.८४ टीएमसी। ४२.८४%
पानशेत। ६०६। ४.७८ टीएमसी । ४४.९२%
वरसगाव। ५९५। ४.४९ टीएमसी। ३५.०४%
टेमघर। ८५६। ०.९० टीएमसी। २४.४०%
एकूण । --। ११.०३ टीएमसी। ३७.८३%
मागील वर्षी । --। ९.४७ टीएमसी। ३२.४९%