पुणे: गुढीपाडव्याच्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बँकांचे कामकाज मराठीतून चालवण्याचा आग्रह केल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. पुणे मनसेच्या वतीने बुधवारी सकाळी आयसीआयसीआय बँकेच्या बंडगार्डन रस्ता शाखेत आंदोलन करण्यात आले. बँक व्यवस्थापनाला निवेदन देत येत्या ८ दिवसात बँकेच्या कामकाजात मराठीला प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली. काही कार्यकर्त्यांनी यावेळी शाखेतील इंग्रजी पोस्टर्स फाडली व घोषणा दिल्या.
मनसेचे संपर्क नेते बाबू वागसकर, प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, रणजीत शिरोळे, महेश भाईभार, अजय कदम व अन्य कार्यकर्ते सकाळीच आयसीआयसीआय बँकेच्या बंडगार्डन रस्ता येथील शाखेत पोहचले. तिथे त्यांनी सुरूवातीला घोषणा दिल्या. काहीजणांनी शाखेत लावलेली योजनाविषयक इंग्रजी पोस्टर्स फाडली. घोषणाही सुरू होत्या. मनसेचे आणखी काही कार्यकर्ते तिथे जमा झाले. त्यामुळे गोंधळ अधिक वाढला. कार्यकर्त्यांच्या या गडबडीमुळे बँकेतील ग्राहक तसेच कर्मचारीही गोंधळले. त्यानंतर बँकेचे व्यवस्थापक अमित दवे तिथे आले. त्यांनी काहीजणांना कार्यालयात बोलावून चर्चा करण्याची तयारी दर्शवली.
बाबू वागसकर, संभूस, बाबर व अन्य कार्यकर्ते त्यांच्यासमवेत गेले. संभूस यांनी दवे यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेले स्थानिक भाषांना बँकांनी प्राधान्य द्यावे हे परिपत्रक वाचून दाखवले. राज्य सरकारचे धोरण स्पष्ट केले. तुम्ही बँकेच्या कामाकाजात मराठी भाषेला प्राधान्य देणे कायद्यानेच बंधनकारक आहे. तरीही तुम्ही मराठीचा वापर करत नाहीत. बँकेच्या योजना ग्राहकांना मराठीत सांगत नाहीत, हा गुन्हा आहेच, शिवाय मराठीचा अवमान आहे, तो आम्ही चालू देणार नाही असे मनसेच्या वतीने बजावण्यात आले.
दवे यांनी सर्व गोष्टी मान्य केल्या, तसेच मराठीला प्राधान्य देण्यात येईल असे सांगितले. पुर्वतयारी करण्यासाठी काही वेळ लागेल असे त्यांनी सांगितले. येत्या ८ दिवसांमध्ये बँकेच्या सर्व शाखांमधील कामकाज मराठीत सुरू व्हायला हवे, योजनासंबधीची माहितीही ग्राहकांना मराठीतून दिली गेली पाहिजे असे त्यांना सांगण्यात आले. आंदोलन आयसीआयसीआय बँकेच्या कार्यालयात केले असले तरी शहरातील अन्य बँकांनाही यासंबधात निवेदने पाठवली असल्याची माहिती संभूस यांनी दिली. मनसेचे कार्यकर्ते बँकांच्या शाखांमध्ये प्रत्यक्ष जाऊन काय परिस्थिती आहे ते पाहतील व त्यासंबधीची माहिती देतील, त्यानंतर कुठे आंदोलन करायचे याचा निर्णय घेतला जाईल असे संभूस म्हणाले. मनसेकडे अनेक बँक ग्राहकांच्या मराठीचा वापर होत नसल्याबद्दल तक्रारी येत असल्याची माहिती त्यांनी दिली.