पुणे : महापालिकेच्या विविध विकास कामांची बिले सादर करण्याची मुदत महापालिका आयुक्तांनी २४ मार्च दिली होती. पण महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांची संख्या आणि व्याप्ती पाहता ठेकेदार संघटनांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता सर्व क्षेत्रीय कार्यालये आणि १ ते ५ परिमंडळ यांना बिले सादर करण्यासाठी २९ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. पुणे महापालिका प्रशासनाने २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये विविध विकास कामांसाठी अंदाजपत्रकीय तरतुदी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात मोठ्या प्रमाणात देयके अदा करण्यासाठी सादर केली जातात. त्यामुळे या महिन्यात प्रमाणाबाहेर खर्च झालेला दिसतो. ही बाब वित्तीय नियमांशी विसंगत असून, प्रशासकीयदृष्ट्या उचित नसल्याने २०२४-२५ या आर्थिक वर्षात तरतूद केलेल्या कामांची देयके २४ मार्चपर्यंत सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी हे आदेश दिले होते.विकास कामांची बिले सादर करण्यासाठी ही मुदत अपुरी आहे. कारण सर्व क्षेत्रीय कार्यालये आणि परिमंडळ यांच्या कामाची व्याप्ती पाहता मुदतवाढ मिळणे आवश्यक आहे, अशी मागणी डॅशिंग ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष विशाल भोसले यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर यांच्याकडे केली होती. अखेर या त्यांच्या मागणीला यश आले आहे. बिले सादर करण्यासाठी आता २९ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र ही मुदतवाढ सर्व क्षेत्रीय कार्यालये आणि परिमंडळसाठी असणार आहे, असे मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
विकास कामांची बिले सादर करण्यासाठी २९ मार्चपर्यंतची मुदत
By राजू हिंगे | Updated: March 20, 2025 20:40 IST