पिंपरी : पिंपरी- चिंचवड आणि पुणे शहराच्या सीमेवर असणाऱ्या मुळा नदी सुशोभिकरणाचा घाट प्रशासनाने घातला आहे. नदीपात्र अरुंद केले जात आहे. येथील नदीकाठचे नैसर्गिक सौंदर्य, वृक्षराजी नष्ट केली जात आहे. महापालिकेच्या ठेकेदारांकडूनच वाकड, पिंपळे निलख, विशालनगर भागात नदीपात्रात भराव टाकला जात आहे. त्यास पर्यावरणवादी संघटनांनी विरोध दर्शविला आहे.उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडच्या सीमेवरून मुळा नदी वाहते. नदीच्या अलीकडच्या बाजूने पिंपरी चिंचवड शहर आणि पलीकडच्या बाजूने पुणे शहर आहे. दोन्ही महापालिका आणि राज्य आणि केंद्र शासनाच्या वतीने नदी सुधार कार्यक्रमाला मंजुरी मिळाली आहे. पिंपरी-चिंचवड भागातील काम सुरू झाले आहे. त्यासाठी साडेसातशे कोटी रुपये खर्च अपेक्षित असून शहराच्या बाजूने ३२० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, पुण्याकडील कामाला मुहूर्त सापडलेला नाही. नदी सुधारसाठी वाकड ते बोपखेल दरम्यानच्या नदीपात्रात खोदकाम आणि भराव टाकण्याचे काम सुरू केले आहे. एकाच बाजूने काम सुरू आहे. दुसऱ्या बाजूने काम सुरू झाले नाही. त्यामुळे पुण्याच्या बाजूस नदीकाठच्या भागात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. नैसर्गिक उतार-चढ काढून टाकण्यात येत आहेत.छोटी मोठी झुडपे उखडून टाकली१) वाकड ते विशालनगरपर्यंत नवीन बालेवाडी पूल येथील नदीचे पात्र अरुंद आहे. यापूर्वीच लोकांनी भराव टाकून पात्र अरुंद केले आहे. त्यातच आता नदी सुधार करण्यासाठी भराव टाकला जात आहे. वाकड गावठाण ते स्मशानभूमी पर्यंत नदीपात्रालगत मोठ्या प्रमाणावर वृक्षराजी आहे. त्या ठिकाणी झुडपे उखडून टाकली आहेत. पात्रातही मुरूम, राडाराडा टाकण्याचे काम सुरू आहे. पिंपळे निलखमध्येही भराव२ ) जगताप डेअरीकडून पिंपळे निलखला जाणाऱ्या रस्त्यावरून बालेवाडीला जाण्यासाठी पूल तयार केला आहे. वाकड कस्पटे वस्ती स्मशानभूमीपासून विशालनगरला जाणाऱ्या नदीपात्रातही काम सुरू आहे. अलीकडच्या बाजूने उंच असणाऱ्या नदीकाठच्या भागातली भिंत तोडली जात आहे. चंद्रकोर नष्ट होणार, बाणेरच्या भागात पाणी शिरू शकते३) पिंपळे निलखकडून बाणेरला जाण्यासाठी पूल उभारण्यात आला आहे. तिथे खोलगट भागात भराव टाकला आहे. छोटी मोठी झाडे झुडुपावरच भराव टाकला जात आहे. पुढे स्मशानभूमी परिसरापासून संरक्षण खात्याच्या नदीपात्रात काम सुरू आहे. या भागात नदीला चंद्रकोर आकार आला आहे. येत्या पावसाळ्यात बाणेरच्या भागात पाणी शिरू शकते...औंधच्या भागात वृक्ष अधिक४) पिंपळे-निलख ते औंध आणि पुढे सांगवी, दापोडी, बोपखेलपर्यंत जुने वृक्ष अधिक आहेत. पिंपळे निलख आणि औंध, बोपखेलपर्यंत सुमारे पाच किलोमीटरचे पात्र लष्करी हद्दीत आहे. तेथील झाडे वाचवावीत, अशी मागणी आहे.
ठेकेदारच बुजवतात मुळा नदीचे पात्र;नदीपात्रात भराव टाकला; छोटी झाडे झुडपे नष्ट
By विश्वास मोरे | Updated: March 29, 2025 12:46 IST