पुणे : शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये प्रत्येक घरात वैयक्तिक शौचालयांची उभारणी करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला असून, त्याकरिता वैयक्तिक स्तरावर निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. येत्या अडीच वर्षांत २८ हजार वैयक्तिक शौचालयांची उभारणी करण्यात येणार असून, त्यासाठी पालिकेच्या हिश्श्यापोटी अडीच वर्षांकरिता १७ कोटी १४ लाख रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे. घरोघर जाऊन शालाबाह्य मुलांचा सर्व्हे करताना, वैयक्तिक शौचालयांचाही सर्व्हे करण्यात आला होता. त्यामध्ये झोपडपट्ट्यांमधील अनेक कुटुंबांकडे शौचालय नसल्याचे आढळून आले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने महापालिकेकडून वैयक्तिक शौचालयांची उभारणी करण्यात येत आहे. महापालिकेने २०१५-१६ या आर्थिक वर्षात ७ हजार ५३५ स्वच्छतागृहे बांधण्यासाठी ५ कोटी ३० लाख खर्च करण्यास मान्यता दिली आहे. २०१६—१७ या आर्थिक वर्षासाठी ९ कोटी आणि २०१७-१८ या वर्षासाठी २ कोटी ८३ लाख रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने ठेवला आहे. सामुदायिक वस्तीपातळीवरही सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहे. ही संख्या वैयक्तिक संख्येच्या २0 टक्के असणार आहे. त्याला अनुदान प्राप्त होणार आहे, असे या प्रस्तावात म्हटले आहे.
वैयक्तिक स्वच्छतागृहांसाठी पुणे महापालिका देणार १७ कोटी
By admin | Updated: September 21, 2015 03:52 IST