पुणे : पालिकेने विनापरवाना खोदाई केल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने ११ लाख ८० हजारांचा दंड केला आहे. पर्वतीजवळील लक्ष्मीनगर येथे समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीसाठी केलेल्या खोदाईप्रकरणी हा दंड करण्यात आला असून, खोदाईकरिता खनिजकर्म विभागाची परवानगी आवश्यक होती. एल अँड टी कंपनीच्या चुकीचा आर्थिक भुर्दंड पालिकेला बसणार आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहरात समान पाणीपुरवठा योजनेकरिता जलवाहिन्या टाकण्यासह पाण्याच्या टाक्या बांधण्याचे काम सुरू आहे. या योजनेचे काम सध्या एल अँड टी कंपनी करीत आहे. लक्ष्मीनगर येथे पाण्याची टाकी उभारण्यात येत आहे. पूर्वीच्या जलतरण तलावाच्या जागेवर ही टाकी बांधली जात आहे. अनेक वर्षांपासून बंद पडलेला जलतरण तलाव तोडून तेथे खोदाई करण्यात येत आहे. परंतु, खोदाई करण्यासाठी आवश्यक खोदाई व वाहतूक परवानगी न घेतल्याने हा दंड करण्यात आला आहे. तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी पालिकेला हा दंड केला आहे.याठिकाणी ५४० ब्रास गौणखनिज उत्खनन झाले असून, त्यापैकी २०० ब्रास मुरूम, राडारोडा वाहतूक करून सिंहगड रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ टाकण्यात आला आहे. याठिकाणी लहान-मोठी अशी एकूण दहा जंगली झाडे आहेत. यासंदर्भात संबंधितांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, पाणीपुरवठा विभागाकडून राजेंद्र तांबे यांनी लेखी म्हणणे दाखल केले होते. जिल्हा प्रशासनाने पालिकेला २०० ब्रास मुरूम उत्खनन प्रकरणी ८० हजार रुपये आणि अनधिकृत वाहतुकीपोटी चालू बाजारभावाप्रमाणे पाचपट दंड ११ लाख रुपये असे एकूण ११ लाख ८० हजार रुपयांचा दंड केला आहे.
अनधिकृत खोदाईप्रकरणी पुणे महापालिकेला पावणेबारा लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 18:50 IST
शहरात समान पाणीपुरवठा योजनेकरिता जलवाहिन्या टाकण्यासह पाण्याच्या टाक्या बांधण्याचे काम सुरू
अनधिकृत खोदाईप्रकरणी पुणे महापालिकेला पावणेबारा लाखांचा दंड
ठळक मुद्देखोदाईकरिता खनिजकर्म विभागाची परवानगी होती आवश्यक