मंचर : धामणी येथील खंडोबा मंदिरात सप्तशिवलिंगावर चंदन उटी सोहळा पार पडला. चैत्री पौर्णिमेला दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. धामणी येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा मंदिरात चंदनाच्या उटीने सजवलेले स्वयंभू सप्तशिवलिंग आणि पंचधातूच्या मुखवट्यावर करण्यात आलेला सुवासिक केशरमिश्रित चंदनाचा लेप स्वयंभू सप्तशिवलिंगाच्या पाठीमागे असलेल्या म्हाळसाकांत खंडोबा, म्हाळसाई, बाणाईच्या सजवलेल्या विलोभनीय सर्वांगसुंदर मूर्तीचे भाविकांनी दर्शन घेतले.पारंपरिक वाद्याच्या साथीत सदानंदाच्या येळकोटचा जयघोष करणारे खंडेरायाचे भाविक आणि आबालवृद्ध महिलांचा उत्स्फूर्त सहभाग हे सारे भक्तिमय वातावरण वासंतिक चंदन उटीच्या सोहळ्याच्या निमित्ताने धामणी येथील पुरातन श्री म्हाळसाकांत खंडोबा मंदिरात शनिवारी चैत्र पौर्णिमेला पहाटे पाहावयास मिळाले.
चंदन उटीच्या सोहळ्याच्या दिवशी धामणीच्या पुरातन खंडोबा मंदिरात पंचरास मंडळीच्या पारंपरिक वाद्याच्या गजराने व जय मल्हारच्या जयघोषाने मंदिर व परिसरात आनंदी वातावरण दिसून आले.