पुणे : विसर्जन मिरवणुकीत यंदा मानाच्या पाच मंडळांसह अन्य प्रमुख मंडळांच्या विसर्जनाचे वेळापत्रक न पाळल्याचा फटका सहभागी होणाऱ्या मंडळाबरोबरच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही बसला. तसेच गेली अनेक वर्ष क्रमाने येणाऱ्या मंडळांचाही क्रम चुकला. तेव्हा अनेक मंडळांनी पोलिसांबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली. यंदा विसर्जन मिरवणुक वेळेस मार्गी लागेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात अनेक वर्षात प्रथमच विसर्जन मिरवणुकीतील सूरच हरविल्याचे चित्र दिसले.
सायंकाळच्या वेळेस पोलिसांनी ठरवून दिलेल्या वेळेनुसार मंडळे मार्गावर आली. परंतु त्यांना पुढे जाण्यासाठी संधीच मिळाली नाही. मंडळ-मंडळांमध्ये- तर कधी ढोल-ताशा पथकांमध्ये पुढे जाण्यावरून वादावादीचे अनेक प्रसंग घडले. गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्यामुळे बेलबाग चौकात अनेकदा चेंगराचेंगरी झाली. अनेक भाविक किरकोळ जखमी झाले, सुदैवाने कोणती मोठी हानी झाली नाही. रात्री उशिरापर्यंत कोणीही वरिष्ठ अधिकारी चौकात उपस्थित नव्हते. अनुभवी अधिकारी नसल्यामुळे येणाऱ्या गर्दीचे लोंढ्यांचे नियोजन न झाल्यामुळे आणि पुढे जाण्यासाठी मंडळांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धांमुळे बेलबाग चौक अडकून पडला होता. सायंकाळी चार नंतर रात्री बारावाजेपर्यंत हीच परिस्थिती चौकात होती.
गेली अनेक वर्ष जिलब्या मारुती, हुतात्मा बाबूगेनू, श्रीमंत भाऊ रंगारी आणि त्यानंतर अखिल मंडई मंडळ क्रमाने विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. पोलिसांच्या नियोजनाअभावी हा क्रम चुकला. मंडई मंडळास सायंकाळी सात वाजता मार्ग करून देणार असे पोलिसांनी आश्वासन दिले होते. मानाच्या पाच गणपती बेलबाग चौकातून मार्गस्थ झाल्यानंतर महोत्सवी वर्ष असलेल्या मंडळांना संधी दिली जाते. चार वाजेपर्यंत पाच मंडळांना सोडण्यात आले. त्यानंतर चार वाजता श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे आगमन झाले. बेलबाग चौकापुढे मिरवणूक अडकून पडल्याने या मंडळाला पुढे जाता येईना, पाच वाजता दगडूशेठ पुढे सरकल्यानंतर अवघे तीन गणपती बेलबाग चौकातून पुढे सरकले होते. साडे आठ वाजता १८ मंडळे गेली चौकातून पुढे सरकले होते. तर ११.१५ वाजेपर्यंत २२ मंडळे गेली होती.महोत्सवी मंडळांना दरवर्षी लवकरच जाण्याची संधी पोलिसांकडून दिली जाते. त्यासाठी या मंडळांना क्रमांक दिले, परंतु नियोजन नसल्यामुळे काही मंडळांना संधी मिळाली, तर काही मंडळे अडकून पडली. मंडळाचे पदाधिकारी वारंवार पोलीसांना भेटून विनंती करीत होते. परंतु काहीही उपयोग झाला नाही. पोलिस आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचेही प्रसंग घडले.