कोरोनाचा राज्यातील रुग्णवाढीचा दर ०.०६ टक्के इतका आहे. पुणे जिल्ह्यातील रुग्णवाढीचा साप्ताहिक दर ०.०९ टक्के इतका आहे. पुण्यापेक्षा अहमदनगर, सातारा, सोलापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा रुग्णवाढीचा दर जास्त आहे. मात्र, सध्या राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. मागील वर्षी गणेशोत्सवानंतर पुण्याने पहिल्या लाटेचा उच्चांक अनुभवला होता. केरळ राज्यात ओणम सणानंतर यावर्षी रुग्णसंख्येने पुन्हा उच्चांक गाठायला सुरुवात केली आहे. भारतात सध्या दररोज सुमारे ४१ ते ४४ हजार रुग्ण आढळून येत असून, त्यापैकी ३१ ते ३२ हजार रुग्ण केवळ केरळ राज्यात नोंदवले जात आहेत. महाराष्ट्रात अशी परिस्थिती उद्भवू द्यायची नसेल तर गणेशोत्सवात लोकांनी गर्दी न करता कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे मत जाणकारांकडून नोंदवण्यात येत आहे.
जिल्ह्यात सध्या तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या दृष्टीने लसीकरणावर भर दिला जात आहे. पुणे विभागात सध्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण झाले आहे. पुणे जिल्ह्यात ८३,६९,००५, सातारा जिल्ह्यात १९,१७,२०० तर सोलापूर जिल्ह्यात १४,८९,१६८ इतक्या नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्यात ९९ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचा पहिला डोस, ६४ टक्के जणांचे दोन्ही डोस झाले आहेत. ९१ टक्के अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा पहिला, तर ६८ टक्के जणांचे दोन्ही डोस झाले आहेत. ४५- ५९ वर्षे वयोगटातील ६८ टक्के नागरिकांचा पहिला, ४३ टक्के नागरिकांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. १८ ते ४४ या वयोगटातील ६३ टक्के नागरिकांचा पहिला, तर ३८ टक्के नागरिकांचे दोन्ही डोस झाले आहेत.
-----------------------
सार्वजनिक आरोग्य विभागाकडून रविवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार, राज्यात जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमधील सक्रिय रुग्णांची संख्या १०० पेक्षा कमी आहे. नंदूरबार, वाशिम, वर्धा, भंडारा, गोंदिया, धुळे या चार जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १० हून कमी आहे.
-----------------------
दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना आता आपण कवचकुंडले धारण केली आहेत आणि आपल्याला कधीच कोरोना होणार नाही, असे वाटू लागले आहे. त्यामुळे अनेकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापरच बंद केल्याचे दिसत आहे. मात्र, लस घेतल्यानंतरही ६ हजारहून अधिक नागरिकांना कोरोनाचा सौम्य स्वरुपाचा संसर्ग झाला आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे नागरिकांनी निष्काळजीपणा न करता कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन न केल्यास गणेशोत्सवानंतर तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येणार नाही.
- डॉ. मिहीर बिनीवाले, जनरल फिजिशियन
--------------------
जिल्हा बाधित बरे झालेले सक्रिय
पुणे ११,२३,७९१ १०,९१,८२४ १२,३२५
ठाणे ५,९७,९४० ५,७९,३०८ ७२७३
सातारा २,४१,०४६ २,२८,३४३ ६६०३
नगर ३,१२,८७९ ३,००,५८९ ५७०१
मुंबई ७,४६,३४१ ७,२३,९०४ ४००३