पिरंगुट: ताम्हिणी घाटात बेवारस अवस्थेत सापडलेल्या तरुणाच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात वारजे माळवाडी पोलिसांनी खून झालेल्या तरुणाच्या मोठ्या भावाला अटक केली आहे. व्यसनांच्या आहारी गेलेल्या लहान भावाशी झालेल्या वादातून त्याचा खून करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. ऋषिकेश अनिल शिर्के (२३, रा. गायकवाड चाळ, मावळे आळी, कर्वेनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ऋषिकेशचा मोठा भाऊ अनिकेत अनिल शिर्के (२६) याला अटक करण्यात आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. २६) सकाळी ताम्हिणी घाटात बेवारस अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह सापडल्याची माहिती पौड पोलिसांना मिळाली हाेती. खून झालेल्या तरुणाची ओळखही पटलेली नव्हती. पौड पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. आरोपी अनिकेतने लहान भाऊ ऋषिकेश याचा ताम्हिणी घाटात खून केल्याची माहिती वारजे माळवाडी पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक सचिन तरडे यांना खबऱ्याने दिली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने अनिकेतचा शोध घेण्यास सुरुवात केली. अनिकेत हा कर्वेनगरमधील वनदेवी मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या टेकडीच्या परिसरात लपून बसला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने लहान भावाचा खून केल्याची कबुली दिली.अनिकेत आणि ऋषिकेश शुक्रवारी (दि.२५) रात्री कर्वेनगर येथून दुचाकीवरून रत्नागिरीतील लांजा तालुक्यातील गोळवशी-शिर्केवाडी येथे देव दर्शनासाठी निघाले. दोघे मध्यरात्री ताम्हिणी घाटातील गोणवडी गावाजवळ थांबले. ऋषिकेशला दारू आणि गांजाचे व्यसन होते. अनिकेतने ऋषिकेशला व्यसन सोडण्यास सांगितले. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात अनिकेतने ऋषिकेशवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. ऋषिकेशचा मृत्यू झाल्यानंतर अनिकेत तेथून पसार झाला.भावाच्या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा शोध सुरू केला. वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश धेंडे यांनी पौड पोलिसांशी संपर्क साधला. त्या वेळी शनिवारी पहाटे गोणवडी परिसरात एक अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडल्याचे पौड पोलिसांनी सांगितले. आरोपी अनिकेतला पौड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पाैड पोलिसांकडून याप्रकरणात तपास करण्यात येत आहे.
अखेर 'त्या' तरुणाची ओळख पटली; 'या' कारणावरून मोठ्या भावाने केला धाकट्या भावाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 13:09 IST