पुणे : शेर्पा समाजजीवनावर व विविध दिग्गज शेर्पांच्या जीवनकथेवर प्रकाश टाकणाऱ्या गिरिप्रेमीच्या उमेश झिरपे यांनी लिहिलेल्या ‘पर्वतपुत्र शेर्पा’या मराठीच्या इंग्रजी अनुवादित ‘माऊंटन- मेन शेर्पा’ पुस्तकाचे प्रकाशन नेपाळची राजधानी काठमांडू येथे करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय बुद्ध संघटनेचे अध्यक्ष एच.एच फुपू छेम्बे शेर्पा थुप्टीन जिकडोल, टीएनएनचे अध्यक्ष खुम सुबेडी तसेच आंग दावा शेर्पा यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला. शेर्पां पत्रकार संघ आणि पिक प्रमोशन प्रा. लि चे संचालक आंग बाबू शेर्पा यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. डिसेंबर २०१९मध्ये उमेश झिरपे यांच्या ‘पर्वतपुत्र शेर्पा’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. शेर्पा समाजावर भाष्य करणारे हे मराठीतील पहिले पुस्तक आहे. कांचंजुंगा शिखरवीर व अनुभवी गिर्यारोहक विवेक शिवदे यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे.
उमेश झिरपे म्हणाले, फक्त गिर्यारोहणच नव्हे तर इतर सर्वच क्षेत्रामध्ये शेर्पा समाजाने आपला ठसा उमटविला आहे. मात्र त्यांच्या कार्याची आजपर्यंत योग्य दखल घेतली गेली नव्हती. या पुस्तकाच्या माध्यमातून शेर्पांची असामान्य कामगिरी, त्यांचे विविध उपक्रम यासोबत शेर्पांची असामान्य कामगिरी, त्यांचे विविध विक्रम त्याचसोबत शेर्पांचे जीवनमान लोकांसमोर उभा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.