पुणे: काही दिवसांपूर्वी शहरामध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. ९) दि पुणे लॉयर्स असोसिएशनतर्फे कौटुंबीक न्यायालयासमोर आंदोलन करण्यात आले. या प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी, ज्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी अत्याचार केला, त्यांना बडतर्फ करण्यात यावे, शक्ती कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, या मागण्या असोसिएशनतर्फे करण्यात आल्या.
कौटुंबीक न्यायालयातील दि पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा ॲड. वैशाली चांदणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात उपाध्यक्ष ॲड. अजय डोंगरे, ॲड. प्रगती पाटील, खजिनदार ॲड. विजय सरोदे , ॲड. झाकीर मणियार, ॲड. के. टी. आरू, ॲड. राणी सोनावणे-कांबळे, ॲड. इब्राहिम शेख, ॲड. मीनाक्षी डिंबळे, ॲड. विष्णू खरात, ॲड. श्रुती सकपाळ, ॲड. सायली भगत, ॲड. गुंड पाटील, ॲड. रेश्मा उतले, ॲड. अमृता पवार, ॲड. बोराटे, ॲड. देवकर, ॲड. गायकवाड आदी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर १४ जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असल्याने या घटनेच्या निषेधार्थ वकिलांतर्फे आंदोलन करण्यात आले. या घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, दामिनी मार्शल सुरू करण्यात यावे, पोलिसांनी हद्दीचा वाद न घालता पीडितांची त्वरित तक्रार नोंदवावी, संबंधित खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, सदर आरोपींचे कोणीही वकीलपत्र घेऊ नये, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.