पुणे - शहरातील अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेणारे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आता अशा धंद्यांना पाठबळ देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मंहमदवाडी येथील बीबीसी रुफटॉप किचन अँड बार (BBC Rooftop Kitchen and Bar) येथे चालविण्यात येणाऱ्या हुक्का पार्लरवर (Hookah Parlour) करण्यात आलेल्या कारवाईनंतर, काळेपडळ पोलीस ठाण्यातील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शरद निवृत्ती नवले (Sharad Nivruti Navale PSI) याला निलंबित करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंहमदवाड परिसरातील बीबीसी रुफटॉप किचन अँड बारवर छापा टाकला होता. या कारवाईदरम्यान ५० हून अधिक तरुण-तरुणी हुक्का पित असल्याचे आढळून आले. पुण्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी हुक्का पार्लरवरील कारवाई होती. या प्रकरणात हॉटेलचा मालक पार्थ अनिल वाल्हेकर याने चौकशीदरम्यान सांगितले की, एप्रिल २०२५ मध्ये हुक्का पार्लर सुरू करताना पोलीस उपनिरीक्षक शरद नवले यांच्याशी चर्चा झाली होती. नवले यांनी गुडलक म्हणत यासाठी ३० हजार व एप्रिल महिन्याचा ‘हप्ता’ म्हणून आणखी ३० हजार, असे एकूण ६० हजार रुपये घेतल्याचे त्यांनी सांगितले. चौकशांती यामध्ये पीएसआय नवले दोशी आढळून आले होते. त्यानंतर त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.