पिंपरी : पीसीएमटीचे पीएमटीत विलीनीकरण केल्यानंतर पीएमपीएमएल आस्थापनेवरील कर्मचारी पिंपरी-चिंचवड महापालिकेत काम करीत होते. तुकाराम मुंढे यांनी पीएमपीचा पदभार स्वीकारल्यानंतर महापालिकेत काम करणाऱ्या मूळच्या १७८ कामगारांना पुन्हा पीएमपीत रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनेक वर्षे राजकीय नेत्यांच्या पाठबळावर महापालिकेचे घरजावई असणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. भाजपा नेत्यांच्या माध्यमातून मुंढे यांच्यावर दबाव टाकण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.पिंपरी-चिंचवडमधील पीसीएमटी आणि पुणे महापालिकेची पीएमपी या दोन संस्थांचे विलीनीकरण करून पीएमपीएमएनएल निर्माण झाली. त्या वेळी पीएमपी आस्थापनेवर अतिरिक्त ठरलेल्या १७८ कर्मचाऱ्यांना १ आॅगस्ट २००१ मध्ये महापालिकेतील विविध विभागांत तात्पुरत्या स्वरूपात वर्ग केले होते. हेल्पर, ड्रायव्हर, मेकॅनिक अशा विविध टेक्निकल पदावरील हे कर्मचारी होते. त्यांना विविध विभागांत वर्गीकरण केले असले, तरी त्यांची आस्थापना पीएमपीच होती. यातील शंभरहून अधिक कर्मचारी राजकीय नेत्यांशी संबंधित असल्याने, तसेच नात्यागोत्यांचे राजकारण असल्याने महापालिकेचे जावई बनले होते. त्यांच्यावर प्रशासन वा कोणाचाही वचक नव्हता.तुकाराम मुंढे यांनी पीएमपीची सूत्रे हाती घेतल्यानंतर सक्षमीकरणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिकेत कार्यरत असणाऱ्या त्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. म्हणून १० एप्रिलला व्यवस्थापकीय संचालकांनी आयुक्त दिनेश वाघमारे यांना पत्र दिले. त्यानुसार ११ एप्रिलला आयुक्तांनी संबंधित कर्मचाऱ्यांना पीएमपीत पाठविण्याचा आदेश काढला आहे. संबंधित विभागांना याबाबत पत्र दिले आहे. ‘अनेक वर्षांपासून हे कर्मचारी महापालिकेत कामास आहेत. त्यांना पुन्हा पीएमपीत पाठविणे चुकीचे आहे. पाठवू नये, अशी मागणी कामगारांची आहे. महापौर नितीन काळजे म्हणाले, ‘‘संबंधित कर्मचारी अनेक वर्षांपासून महापालिकेत काम करीत आहेत. त्यातील अनेकजण निवृत्तीच्या मार्गावर आहेत. ज्या वेळी आपणास कर्मचारी हवे होते, त्या वेळी सर्वसाधारण सभेने ठराव करून ते कर्मचारी मागवून घेतले होते. आता सर्वसाधारण सभेत यावर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, त्यापूर्वीच संबंधितांना परत पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. कामगारांच्या प्रश्नाबाबत आम्ही आयुक्त आणि नेत्यांशी चर्चा करणार आहोत.’’(प्रतिनिधी)गुरुवारपर्यंत मुदत : रुजू न होणाऱ्यांवर कारवाईमुंढे यांच्या मागणीनुसार आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सोमवारीच संबंधित कर्मचाऱ्यांना पीएमपीत रुजू व्हावे, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. भाजपातील काही ज्येष्ठ नेत्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. या कर्मचाऱ्यांना ठेवायचे, की पाठवायचे याबाबतही भाजपा नेत्यांमध्ये मतभेद दिसून येत आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांना गुरुवारी दुपारी चारपर्यंत रुजू होण्याचा आदेश दिल्याने उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे प्रशासनाने सूचित केले आहे.संबंधित कर्मचारी हे पीएमपी या कंपनीचे कर्मचारी आहेत. त्या कंपनीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासल्याने महापालिकेस मागणी केली आहे. त्यामुळे आम्ही कंपनीस कामगार वर्गीकरण केले आहेत. संबंधित कर्मचारी महापालिका आस्थापनेवरील नाहीत. संबंधित विभागात असणाऱ्या रिक्त जागेवर अन्य कर्मचारी नेमावेत अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी पीएमपीत रुजू होणे आवश्यक आहे. - दिनेश वाघमारे, आयुक्त
‘त्या’ कामगारांसाठी दबाव
By admin | Updated: April 13, 2017 03:51 IST