पिंपरी : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. बंदोबस्तासाठी पोलिसांनी जादा कुमक मागवली असून, वाहतूक पोलीस आणि अग्निशामक विभागानेही ठिकठिकाणी योग्य ती दक्षता घेतली आहे. शहरातील विविध १४ घाटांवर गणेश मूर्तींचे विसर्जन होणार असल्याने त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रमुख गर्दीची ठिकाणे, चौकात टेहळणीसाठी पोलिसांनी टॉवर उभारले आहेत. नदीघाटावर महापालिकेच्या सहकार्याने अग्निशामक विभागाने सोडियम व्हेपरचे दिवे लावले आहेत.पोलीस कर्मचाऱ्यांसह, बीएसएफ, स्ट्रायकिंग फोर्स, शीघ्र कृती दल (क्यूआरटी), होमगार्ड, तसेच प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचारी, अशी जादा कुमक सज्ज ठेवण्यात आली आहे. गर्दीवर नियंत्रण राहावे, यासाठी वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त महेंद्र रोकडे यांनी वाहतूक व्यवस्थापनाचे नियोजन केले आहे. वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदलसुद्धा सुचविले आहेत. शहरात एकूण १४३५ गणेशोत्सव मंडळे आहेत. पाचव्या, सातव्या दिवशी आणि दहाव्या दिवशी अशी टप्प्याटप्प्याने सुमारे एक हजार मंडळांनी गणेश मूर्तींचे विसर्जन केले आहे. अनंत चतुर्दशीदिनी उर्वरित गणेश मंडळे गणेश मूर्तींचे विसर्जन करणार आहेत. चिंचवड घाटावर सुमारे २५० आणि पिंपरी विसर्जन घाटावर सुमारे १५० मंडळे मिरवणुकीने येऊन गणेश मूर्तीचे विसर्जन करतील. महापालिकेने चिंचवड गावात चापेकर चौकात आणि पिंपरीत कराची चौकात स्वागत कमान उभारली आहे. परिमंडल तीन पोलीस उपायुक्त कार्यालयाने गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस बंदोबस्ताचे नियोजन केले नसले, तरी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बंदोबस्त देण्याच्या सूचना केल्या आहेत.पिंपरी, चिंचवड, निगडी, सांगवी, भोसरी, एमआयडीसी, वाकड आणि हिंजवडी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तेथील अधिकाऱ्यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. येथील पवना घाट, पिंपरी सुभाषनगर येथील विसर्जन घाट, निगडीतील गणेश तलाव, सांगवीतील घाट आणि भोसरीतील तलाव या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
विसर्जनासाठी यंत्रणा सज्ज
By admin | Updated: September 27, 2015 01:19 IST