पुणे : गद्दार शब्दालाही लाज वाटावी, असे कृत्य आमदार अनिल भोसले यांनी केले आहे. एका घरात आमदारकी दिल्यावर त्याच घरात नगरसेवकपद देऊ नये, हे अपेक्षितच आहे; मात्र त्यांना समजले नाही. गद्दारी केली. त्यांना नोटीस बजावू, काय उत्तर देतात ते पाहू व कारवाई करू, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी केलेले आमदार भोसले यांचा समाचार घेतला. सत्ता बहुजनांच्या हातात देणार की मुठभरांच्या, असा सवाल त्यांनी केला.महापालिका निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला सारसबाग चौकात पवार यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी सुरुवात झाली. शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप, राज्य प्रवक्ते अंकुश काकडे, तसेच पक्षाचे महापालिकेतील सर्व उमेदवार या वेळी उपस्थित होते. खासदार चव्हाण यांनी राज्य सरकारने जाहीर केलेल्या शहराच्या विकास आराखड्यावर टीका केली. महापौर जगताप यांनीही भाजपावर हल्ला चढविला. पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुण्याचे पाणी अडवून ठेवले होते. त्यांचे आमदार, नगरसेवकही शांत होते. त्यांच्या हातात महापालिका कशासाठी द्यायची, असा सवाल त्यांनी केला. एकाही नगरसेवकावर भ्रष्टाचाराचा आरोप नाहीराष्ट्रवादीच्या सत्तेच्या गेल्या १० वर्षांत अनेक विकासकामे केली. ती पुणेकरांसमोर आहेत. मेट्रो आम्ही कात्रज ते निगडी अशी मान्य केली होती. त्यांनी घाईघाईत स्वारगेट ते निगडी, असा मार्ग मान्य केला. त्याला विलंब लावला. केंद्र व राज्यातील सत्तेच्या अडीच वर्षांत पुण्यासाठी अभिमान वाटावे असे काय केले ते जाहीर करावे, असे आव्हान पवार यांनी दिले. १० वर्षांच्या सत्तेच्या काळात राष्ट्रवादीच्या एकाही नगसेवकावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाहीत, याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले.
सत्ता बहुजनांच्या हातात देणार की मूठभरांच्या?
By admin | Updated: February 7, 2017 03:26 IST