मंदिरात गुलाल उचलून घेतली शपथ, ढेकळवाडी ग्रामपंचायत चर्चेत
काटेवाडी :एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ल्याची कथा आपण नेहमी ऐकतो. तसेच सरपंच आणि
उपसरपंचपद सात जणांनी वाटून घेतल्याचा प्रकार बारामती तालुक्यातील
ढेकळवाडी येथे घडला आहे. महिला ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या
सरपंचपदासाठी महिला सदस्यांच्या पतीराजांनी ग्रामदैवत बुवासाहेबांच्या
मंदिरात गुलाल उचलून शपथ घेतल्याचा व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला
आहे. त्यामुळे ढेकळवाडी ग्रामपंचायत चर्चेत आली आहे.
ढेकळवाडी (ता. बारामती) येथील ग्रामपंचायातीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी
चुरशीच्या झालेल्या लढतीमध्ये प्रस्थापितांना बाजूला सारून तरुणांना संधी
मिळाली आहे. या तरुणांनी मातब्बर पॅनेल प्रमुखांना या निवडणुकीत अस्मान
दाखविले आहे. वार्डनिहाय पॅनेल निवडणुकीत उभे केले होते. राष्ट्रवादी
काँग्रेसच्या दोन गटांत ही निवडणूक चुरशी झाली होती. आता खरी चुरस संरपच
पदासाठी सरपंच पद हे ओबीसी महिला प्रवर्ग आहे. संरपच पदासाठी ११ पैकी सात
जण एकत्र आले आहेत. या सात जणांनी जागृत देवस्थान बुवासाहेब यांच्या
मंदिरात दोन्ही पदाचा कार्यकाल वाटून घेतला आहे. तसेच ठरल्याप्रमाणेच
राजीनामे देऊन त्या पदासाठी इतर सदस्यांना संधी देण्याची शपथसुद्धा
या वेळी घेण्यात आली. यामध्ये चार महिला सदस्य व तीन युवक सदस्यांचा
समावेश आहे. वार्ड क्र. १ :बुवासाहेब पॅनेलच्या सीमा राहुल ठोंबरे, सीमा
भालेराव झारगड व राहुल ज्ञानदेव कोळेकर वार्ड २ - हर्षल बाळासो चोपडे,
वार्ड ४ - लक्ष्मी बाळासो बोरकर, सुनीता संजय टकले व शुभम प्रताप ठोंबरे
या सात उमेदवारांनी परिसरातील जागृत देवस्थान बुवासाहेब येथील मंदिरात
शपथ घेतली की, सरपंच पद चार माहिलांमध्ये, तर उपसरपंच पदाचा कार्यकाळ तीन
युवकांमध्ये वाटून घेण्याचे ठरले आहे. सरपंच व उपसरपंच पदाचा कार्यकाळ
पूर्ण होताच त्यांनी राजीनामा देऊन ठरल्याप्रमाणे दुस-या सदस्यांना संधी
द्यायची ठरली आहे याप्रमाणे निवडणुकीअगोदरच मंदिरात शपथ घेऊन सरपंच,
उपसरपंच पदाचे उमेदवार व कार्यकाल ठरला आहे. महिला सदस्याच्या पतीराजानी
एकमेकांना साथ देण्याची शपथ घेतली आहे.
ढेकळवाडी येथील ग्रामदैवत बुवासाहेबांच्या मंदिरामध्ये
ग्रामपंचायत सदस्य व महिला सदस्यांच्या पतीराजांनी सरपंच, उपसरपंच पदाची
वाटणी करून शपथ घेतली.