अभिजित कोळपे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत प्रकल्प आराखड्यातील पदे केंद्र शासनाने सन २०२१-२२ या प्रकल्प आराखड्यात मंजूर न केल्याने राज्यातील ५९७ आरोग्य विभागाची पदे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रात्रं-दिवस सेवा करून परिवारापासून तीन-तीन महिने लांब राहून राज्याला कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यास सहकार्य केले आहे. मात्र, असे असतानाच केंद्र शासनाने हा निर्णय घेणे अत्यंत चुकीचा आहे, अशी भावना महिला आरोग्य सेविकांनी व्यक्त केली आहे.
सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात आराखड्याची अंमलबजावणी करण्याकरिता नर्सिंग कार्यक्रमासाठी एफएमआर ८.१.१.१ या अंतर्गत बिगर आदिवासी क्षेत्राकरिता ३२०७ एएनएमची पदे मंजूर करण्याकरिता केंद्र शासनाकडे राज्यातील ५९७ पदांना मंजुरी व वेतन दिलेले नाही. ५९७ पदे रिक्त करण्याचे आदेश राज्याचे आयुक्त आरोग्य विभाग यांनी सर्व उपसंचालक आरोग्य विभाग परिमंडल सर्व, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.
---
जिल्हानिहाय रिक्त होणारी पदे पुढीलप्रमाणे
* कोल्हापूर - ३९, साेलापूर - ३९, नांदेड -३७, बीड - ३०, सातारा - २९, अहमदनगर -२९, नागपूर -२४, बुलढाणा - २४, सांगली -२३, वर्धा -२२, लातूर - २२, यवतमाळ - २१, सिंधुदुर्ग - २१, रायगड - २१, रत्नागिरी -१९, अमरावती -१९, नाशिक -१९, परभणी -१९, जळगाव -१९, पुणे - १६, उस्मानाबाद - १६, अकोला - १३, हंगोली -१२, भंडारा - ११, चंद्रपूर - ११, धुळे -१०, जालना -१०, वासिम - ९, औरंगाबाद - ८, ठाणे - ३, पालघर -१, नंदुरबार -०, गोंदीया - ० आणि गडचिरोली - ० अशी राज्यातील एकूण ५९७ पदे रिक्त होत आहेत.
----
पुणे जिल्ह्यातील १६ पदे
राज्यातील ५९७ महिलांची पद रद्द केलेली आहेत. त्यांना त्वरित थेट आरोग्य विभागात नोकरी द्यावी. रद्द केलेल्या ५९७ पदांपैकी पुणे जिल्ह्यातील १६ आरोग्य विभागाच्या सेविकांचा समावेश आहे. यामध्ये आंबेगाव ३, बारामती १, इंदापूर १, जुन्नर १, खेड १, पुरंदर ३, शिरूर २ येथील आरोग्य महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.यापैकी पुणे जिल्ह्यातील चार जागा रिक्त असल्याने १२ जागा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
---
राज्य आणि केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णय रद्द करून आरोग्य सेविकांना राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सेवाज्येष्ठतेनुसार न्याय देण्यात यावा. अन्यथा प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- सुरेखा ढवळे, प्रदेशाध्यक्ष, प्रहार अपंग क्रांती संघटना