कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्ष वगळता इतर वर्षांच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात आला.अंतिम वर्षाच्या परीक्षा उशिरा सुरू झाल्याने आणि परीक्षांचा निकाल जाहीर करण्यास विलंब झाल्याने प्रवेश प्रक्रिया लांबली. सध्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असली, तरी प्रत्यक्षात वर्ग सुरू झाले नाहीत.मात्र,पुणे विद्यापीठाने पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे शैक्षणिक सत्र जाहीर केले असून त्यानुसार प्रथम सत्र २८ जानेवारी ते २२ मे २०२१ या कालावधीत तर दुसरे सत्र १५ जून २०२१ ते १ ऑक्टोबर २०२१ या कालवधीत असेल. तसेच अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट यासह इतर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अजून सुरू असून ही प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर प्रथम व द्वितीय सत्राचे स्वतंत्र वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील एमएससी, एमकॉम, एमए, मेंटल मॉरल अँड सोशल सायन्स, एमए एज्युकेशन, बीएस्सी बीएड इंटिग्रेटेड, एमलीब, फाइन आर्ट, एम.ए जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन हे वर्ग सुरू होणार आहेत.
राज्य शासनाने प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली नसल्याने सध्या प्रथम वर्षाचे वर्ग हे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. शासन आदेशनंतर प्रत्यक्ष वर्ग सुरू केले जाणार आहेत, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
----
पुणे विद्यापीठातील विविध विभागांमधील एमएससी, एमटेक, एमकॉम, एमबीए एक्झिकेटीव्ह, एमबीए (फार्मा बीटी), एमए, मेंटल मॉरल अँड सोशल सायन्स, एलएलएम, एमए एज्युकेशन, बीएस्सी बीएड इंटिग्रेटेड, एमलीब, फाइन आर्ट, एम.ए जर्नालिझम अँड मासकम्युनिकेशन आणि एमए योगा अभ्यासक्रम ऑनलाइन पध्दतीने सुरू होणार आहेत,असे विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.