पुणे : चार सदस्यांचा एक प्रभाग यामुळे राजकीय बदल तर झालेच; पण प्रशासनालाही बरेच वाढीव काम लागले आहे. मतदान केंद्रांची संख्या तर वाढलीच आहे; पण आता एखाद्या प्रभागातील ‘अ’, ‘ब’, ‘क’ किंवा ‘ड’ अथवा चारही गटांत उमेदवारांची संख्या वाढली, तर मतदान यंत्रांची संख्याही वाढणार आहे. तसेच प्रत्येक मतदाराला चार मते देणे बंधनकारक असून एखाद्या गटात मतदान करायचे नसेल, तर तिथेही त्याला नोटाचा (नकाराधिकार) पर्याय वापरावाच लागेल.प्रत्येक प्रभागात ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’, असे चार गट आहेत. मतदान यंत्रावर ‘अ’चे उमेदवार, त्यानंतर एक कोरी पट्टी व नंतर ‘ब’ गटाचे उमेदवार याप्रमाणे सर्व गटांचे उमेदवार या प्रकारे मतदान यंत्रावर रचना असेल. प्रमुख राजकीय पक्षांचे प्रत्येक गटात चार उमेदवार जमेस धरता एका प्रभागात १६ अधिकृत उमदेवार तेच होतात. त्यानंतर अन्य राजकीय पक्षांचे उमेदवार येतील. मतदान यंत्रावर उमेदवाराचे पूर्ण नाव, त्याला दिलेले चिन्ह व त्यापुढे मतदान करण्याकरिता बटण असेल. एका मतदान केंद्रावर ७०० मतदार याप्रमाणे एकूण ११ लाख ९९ हजार ४७ मतदारांसाठी साधारण १६१४ मतदान केंद्रे, त्यात ६ हजारांपेक्षा अधिक मतदान यंत्रे असतील. एका केंद्रावर किमान ६ कर्मचारी याप्रमाणे १२ हजार कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत असतील. या सर्वांचे नियोजन करण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये, खासगी कार्यालये यातून कर्मचारी घेण्यात आले आहेत. या सर्वांना तीन टप्प्यांत निवडणूक प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात येईल. शहरातील काही सोसायट्यांमध्येही मतदानाची सोय करण्यात येणार आहे.(प्रतिनिधी) एका यंत्राची क्षमता १५ नावांची : नोटासाठी एक जागाएका मतदान यंत्राची क्षमता १५ नावांची आहे. त्यातील एक नाव नकाराधिकारासाठी (नोटा) असेल. म्हणजे एका यंत्रावर १४ नावे असतील. त्यामुळेच प्रत्येक मतदान केंद्रात किमान २ मतदान यंत्रे असतील. हीच संख्या ६ हजारांपेक्षा जास्त आहे. त्यातच एखाद्या प्रभागातील एखाद्या गटात उमेदवारांची संख्या जास्त असेल, तर तिथे जास्त मतदान यंत्रे लागू शकतात. उमेदवारांची नावे अंतिम होताच निवडणूक शाखेला मतदान यंत्रांच्या संख्येचा अंदाज घेऊन तेवढ्या यंत्रांची मागणी निवडणूक आयोगाकडे नोंदवावी लागेल. यंत्रावर उमेदवाराच्या चिन्हाबरोबरच त्याचे छायाचित्रही असावे, अशी मागणी आहे. त्यासाठी प्रयत्नही सुरू आहेत; मात्र ते शक्य झालेले नाही.चार मते दिल्यावरच प्रक्रिया पूर्ण होणार : मतदाराने चार मते दिल्याशिवाय त्याची मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. चार मते दिल्यानंतरच केंद्राधिकाऱ्याच्या समोरच्या यंत्रावर ‘बीप’ असा आवाज येईल. तीन किंवा दोनच मते दिली, तर असा आवाज येणार नाही. त्यामुळे एखाद्या मतदाराला दोनच मते देऊन बाहेर यायचे असेल, तर ते शक्य नाही. त्याला उर्वरित गटांसाठी ‘नोटा’चा म्हणजे नकाराधिकाराचा पर्याय वापरावाच लागेल. त्यानंतरच त्याची मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल. मतदार हा पर्याय वापरत नसेल, तर केंद्राधिकारी त्याला तशी विनंती करून मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगतील.
उमेदवार संख्येनुसार मतदान यंत्रे
By admin | Updated: January 31, 2017 03:59 IST