पुणे : निवडणुकीच्या काळात होणाऱ्या पैशांच्या अवैध व्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाकडून नेमण्यात आलेल्या तपासणी पथकांनाच छापे टाकून पैसे पकडण्याचे अधिकार असून, पोलिसांना सुमोटो अशा प्रकारची कारवाई करण्याचे अधिकार नाही. त्यामुळे शिरूर पोलिसांनी बुधवारी वाहनाची तपासणी करून पकडलेल्या ६३ हजार रुपयांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये ६ तपासणी पथकांची नेमणूक केली आहे. त्या पथकांमध्ये राजपत्रित अधिकारी, पोलीस अधिकारी, विक्रीकर विभागाचे अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे. तपासणी पथकाकडून केल्या जाणाऱ्या संपूर्ण कारवाईचे व्हिडीओ चित्रीकरण करणे बंधनकारक आहे. निवडणुकीतील पैशांचे व्यवहार हा अत्यंत संवेदनशील विषय असल्याने निवडणूक विभागानेही कारवाईसाठी काही नियम निश्चित केलेले आहेत. त्यामध्ये पोलिसांना सुमोटो पैसे पकडण्याचे अधिकार देण्यात आलेले नाहीत. बुधवारी शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रामध्ये वाहनांची तपासणी करताना पोलिसांना बेनामी ६३ हजार रुपयांची रक्कम सापडली.पोलिसांनी कारवाई करून ती रक्कम जप्त केली आहे. वस्तुत: निवडणुकीच्या भरारी पथकाला बोलावून ही कारवाई केली जाणे आवश्यक होते. उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी समीक्षा चंद्रकार यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता तपासणी पथकाला छापे टाकून पैसे पकडण्याचे अधिकार देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)
‘सुमोटो’ पैसे पकडण्याचा पोलिसांना नाही अधिकार
By admin | Updated: September 25, 2014 06:15 IST