पुणे : पूजा चव्हाण या २२ वर्षाच्या तरुणीच्या मृत्यु प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. पूजा चव्हाण हिचा ७ फेब्रुवारी रोजी मृत्यु झाला. याप्रकरणात वानवडी पोलीस तपास करीत आहेत. अजूनही याप्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. याप्रकरणी पुणे पोलिसांकडून कोणतीही माहिती दिली जात नाही.
लष्कर भरती परिक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणाची माहिती देण्यासाठी मंगळवारी दुपारी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या गुन्ह्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे. पूजा चव्हाण हिच्या शवविच्छेदन अंतिम अहवालात काय म्हटले आहे, असे प्रश्न विचारले. त्यावर आयुक्त गुप्ता यांनी केवळ हसून काहीही न बोलता पत्रकार परिषद संपवून ते निघून गेले. पाठोपाठ त्याची सर्वाधिक चर्चा सुरु झाली.