पुणे : मनुष्याचे बाह्य आणि अंतर असे दोन विश्व असतात. यात कधी संवाद, तर कधी संघर्ष असतो. कवी कविता लिहितो म्हणजे काय करतो, तर जगण्यातले दुःख, आनंद आणि संघर्ष या तीन त्रिज्यांमधून आलेल्या आतल्या आवाजाचा संघर्ष शब्दबद्ध करतो, तर कधी त्याच्याशी संवाद साधतो. बाह्य आणि अंतरविश्वातील संघर्षाचा हुंकार म्हणजे कविता, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डाॅ. रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले.
शांती पब्लिकेशन्स तर्फे प्रकाशित उद्धव कानडे लिखित ‘केशरमाती कविता आणि समीक्षा’ या समीक्षाग्रंथाचे प्रकाशन डाॅ. कसबे यांनी केले. त्यानंतर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी होते. लेखक-कवी उद्धव कानडे, महाराष्ट्र कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर, प्रकाशक रघुनाथ उकरंडे आदी या वेळी उपस्थित होते. प्रा. विश्वास वसेकर आणि डाॅ. संभाजी मलघे यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे. ज्येष्ठ कवी बंडा जोशी यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.